रेल्वे प्रवास पुन्हा महागला! मेल-एक्प्रेसच्या तिकीट दरात वाढ, शुक्रवारपासून नवे दर

देशभरातील रेल्वे प्रवास पुन्हा महागला आहे. रेल्वे मंत्रालयाने मेल-एक्प्रेसच्या तिकीट दरात प्रति किलोमीटर 1 ते 2 पैशांची वाढ केली आहे. येत्या शुक्रवार, 26 डिसेंबरपासून ही दरवाढ लागू होणार आहे. त्यामुळे रेल्वेचे तिकीट 10 ते 55 रुपयांनी महागणार आहे. रेल्वेने चालू वर्षात ही दुसरी दरवाढ करुन प्रवाशांना झटका दिला. यापूर्वी 1 जुलैला दरवाढ केली होती. मुंबईच्या लोकल ट्रेनचे तिकीट आणि मासिक पासच्या दरात कोणतेही बदल केलेले नाहीत.

नवीन वर्ष उजाडण्यास काही दिवस बाकी असताना रेल्वे मंत्रालयाने 179 दिवसांत लांब पल्ल्याच्या तिकीट दरात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. प्रशासनाने रविवारी दरवाढीची अधिकृत घोषणा करून संपूर्ण देशभरातील प्रवाशांना धक्का दिला. नव्या दरवाढीनुसार, 215 किलोमीटरहून अधिक अंतराच्या प्रवासासाठी जनरल श्रेणीच्या तिकीट दरात प्रति किमी 1 पैशांचा, तर मेल-एक्प्रेस नॉन-एसी आणि एसी कोचच्या तिकीट दरात प्रति किमी 2 पैशांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. 215 किमीपर्यंतच्या पॅसेंजर ट्रेनच्या तिकीट दरात कोणतेही बदल केले नसल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले. या दरवाढीमुळे रेल्वेला मोठा महसूल प्राप्त होणार आहे. महसुलामध्ये जवळपास 600 कोटींची वाढ होण्याची अपेक्षा रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केली आहे. 500 किमीपर्यंतच्या नॉन-एसी प्रवासासाठी सध्याच्या तिकिटापेक्षा 10 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. रेल्वेने वर्षभरात दोनदा केलेल्या तिकीट दरवाढीचा प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. कुटुंबीयांसोबत लांब पल्ल्याचा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बजेट पूर्णतः कोलमडणार आहे.

सततच्या दरवाढीवर  प्रवाशांची तीव्र नाराजी

रेल्वे प्रशासनाने 179 दिवसांत दुसऱ्यांदा दरवाढ केल्यामुळे प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तिकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. मात्र दरवाढीचे धक्के दिले जात आहेत हे संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनांकडून दिली जात आहे.

मुंबई ते दिल्ली प्रवासात अतिरिक्त 27 रुपयांचा भार

रेल्वेने मुंबईतून दिल्लीला जाण्यासाठी प्रवाशांना प्रत्येक तिकिटामागे अतिरिक्त 27 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. मुंबई ते दिल्ली रेल्वे मार्गिका 1386 किलोमीटरची आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज (सीएसएमटी) येथून दिल्लीला जाण्यासाठी राजधानी एक्सप्रेसच्या थ्री टियर एसी कोचचे भाडे 3180 रुपये आहे. ते आता 3207 रुपये होणार आहे.