मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे, ऑनलाइन बुकिंग आता सुपरफास्ट; रेल्वेची नवी प्रणाली लवकरच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय रेल्वे प्रवासी आरक्षण प्रणालीत मोठा तांत्रिक बदल करत ‘नेक्स्टजेन पीआरएस’ प्रणाली लवकरच सुरू करणार आहे. या नव्या प्रणालीमुळे येत्या काळामध्ये मिनिटाला तब्बल 32 हजारांऐवजी तब्बल दीड लाख रेल्वे तिकिटे बुक होणार आहेत. सध्या ऑनलाइन तिकीट बुकिंगचे प्रमाण जास्त आहे. म्हणूनच रेल्वेने ही तांत्रिक सुधारणा केली आहे. नव्या प्रणालीमधील अपडेट ऑगस्टपासून प्रत्यक्षात लागू होणार आहेत.

भारतीय रेल्वेने 40 वर्षांपूर्वी म्हणजेच 1985 मध्ये दिल्ली येथे पीआरएस प्रणाली सुरू केली होती. 1999 मध्ये देशव्यापी नेटवर्किंग पूर्ण झाल्यानंतर देशातील कोणत्याही जोडलेल्या आरक्षण केंद्रातून तिकीट आरक्षण, पीएनआर चौकशी आणि तिकीट रद्द करण्याची सुविधा उपलब्ध झाली. सध्या देशातील जवळपास 80 टक्के रेल्वे तिकिटे रेल्वे पर्यटन आणि आयआरसीटीसी माध्यमातून ऑनलाइन बुक केली जातात.

मुंबईसाठी स्वतंत्र डेटा सेंटर

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तिकीट बुकिंगचा सर्वाधिक ताण दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या भागातून प्रणालीवर येतो. त्यामुळे नव्या प्रणालीसाठी या चार शहरांमध्ये प्रमुख डेटा सेंटर राहणार असून त्याचे सिकंदराबाद येथे डिजास्टर रिकव्हरी बॅकअप सेंटर असणार आहे.