रेल्वे सुरक्षा बलाच्या हातावर आता ‘जिओ टॅग’चे बंधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे सुरक्षा बलाचे जवान योग्य डय़ुटी बजावत आहेत की नाहीत यावर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नजर ठेवली जाणार आहे. त्यासाठी जिओ फेन्सिंग आणि गुगल मॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर मध्य रेल्वे करणार आहे. त्यामुळे आरपीएफ जवानांच्या स्थानकातील सद्यस्थितीचा कॉम्प्युटरवर बसल्या जागी नियंत्रण कक्षातून आढावा घेणे सोपे होणार आहे.

मध्य रेल्वेकडे तैनात असलेल्या आरपीएफच्या जवानांची संख्या मर्यादित असल्याने त्यांचा योग्य उपयोग करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वेच्या मालमत्तेच्या सुरक्षेत हलगर्जीपणा होऊ नये तसेच कामचुकार कर्मचार्‍यांना शिस्त लागावी या उद्देशाने मध्य रेल्वे सुरक्षा बलाने गुगल मॅपिंगचा आधार घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये प्रथमच जिओ टॅग प्रणाली अमलात आणली जाणार आहे. यामुळे स्थानकातील डय़ुटीवर तैनात जवानाची सद्यस्थिती समजण्यास मदत मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनचा पसारा मोठा आहे. या सीएसएमटी ते खोपोली, कसारा, लोणावळा, इगतपुरी या मुंबई विभागात नवीन प्रणाली वापरण्याची योजना आहे. मध्य रेल्वेकडे आरपीएफच्या जवानांची संख्या 1,500 पेक्षा जास्त आहे, मात्र स्थानकांच्या संख्येच्या तुलनेत ती पुरेशी नाही. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर व्हावा यासाठी हे आधुनिक तंत्रज्ञान मदतीला येणार आहे.  दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशा गर्दीच्या स्थानकांत सुरक्षा जवानांवर मोठी जबाबदारी असते. या नव्या जिओ अटेंडन्स योजनेमुळे प्रत्येक जवानाचे लोकेशन संगणकाच्या क्रीनवर दिसणार आहे.

घाटात येणार नेटवर्कची अडचण

आरपीएफच्या मनुष्यबळाची सद्यस्थिती वरिष्ठ अधिकार्‍यांना समजावी म्हणून जिओ टॅग प्रणाली वापरण्यात येणार आहे.  या कामासाठी इंटरनेटच्या नेटवर्कची गरज असल्याने घाट सेक्शनमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे.  या योजनेसाठी लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. यात कार्यरत जवानाच्या हाताला ‘जिओ टॅग’ बांधला जाणार आहे. या प्रणालीमार्फत प्रत्येक स्थानकाचे गुगल मॅपिंग केले जाणार आहे. तो नकाशा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कार्यालयात असलेल्या क्रीनवर दिसणार असून त्यात तैनात जवानांची सद्यस्थिती समजणार आहे. वरिष्ठांनी सुरक्षेसाठी डय़ुटीवर तैनात केलेला जवान आपली जागा सोडून अन्यत्र कुठे गेला असेल तर तेही समजेल. यामुळे कामचुकारांना शिस्त लागून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत मिळणार आहे.