
सामना ऑनलाईन । मुंबई
लाल कपडे आणि खांद्याला पितळेचा बिल्ला लावून विविध रेल्वे टर्मिनसवर प्रवाशांना त्यांच्या बॅगा आणि अवजड सामान उचलून देण्यासाठी सध्या हमाल आर्जव करताना दिसतात. एकेकाळी व्यवस्थित पोट भरेपर्यंत कमाई होणाऱया या व्यवसायात आता बदलत्या काळात उपासमार होत असल्याने रेल्वेच्या हमालांनी अनोख्या पद्धतीने आपल्या मागण्यांकडे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईसह देशभरातील हमाल सध्या रेल्वेमंत्र्यांना आपल्या पदरच्या पैशातून मनिऑर्डर करीत आहेत. रेल्वेमंत्र्यांनी आपणाला ‘ग्रुप डी’मध्ये सामावून घ्यावे अशी त्यामागची त्यांची भूमिका आहे.
रेल्वेचे मुंबईत मोजकेच टर्मिनस असून त्यातही हल्ली फारसे कोणी स्वतःसोबत अवजड सामान घेऊन प्रवास करीत नाहीत. शिवाय हल्लीच्या बॅगांना चाके असतात. सध्या कोणी हमालांना सामान वाहून नेण्यासाठी बोलावत नाही. रेल्वे स्थानकांवर सध्या सरकते जिने बसविण्याच्या रेल्वे प्रशासनाच्या धोरणांमुळे रेल्वे हमालांची उपासमार होत आहे. त्यामुळे हमालांना बढती देऊन त्यांचा समावेश रेल्वेच्या ‘ग्रुप डी’च्या नोकऱ्यांमध्ये करावा या प्रमुख मागणीसाठी पश्चिम रेल्वेच्या लायसन्स हमालांनी या वर्षाच्या सुरुवातीस फेब्रुवारी महिन्यात संपही केला होता. याकडे हमालांची देशपातळीवरील संघटना लाल वर्दी कुली युनियनने लक्ष वेधले आहे.
२००८मध्ये रेल्वेच्या काही ‘अनफिट’ हमालांना रेल्वेच्या गँगमन पदासाठी सामावून घेण्यात आले होते. त्यावेळी अनेकांना भरती होता आले नाही. आता लायसन्स पोर्टर्सना प्रवासी टाळत आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत या उपासमारीने वैतागलेल्या देशभरातील हमालांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वेमंत्र्यांना मनिऑर्डर करण्याचे अभिनव आंदोलन सुरू केल्याचे मुंबई सेंट्रल स्टेशन लायसन्स पोर्टर्स युनियनचे प्रकाश कुटे यांनी म्हटले आहे.





























































