
मुंबईत 15 ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांसाठी लोकल प्रवास करता येणार असला तरी प्रवाशांना फक्त मासिक पास मिळणार असून तिकीट दिले जाणार नाही. मासिक पास देण्याची सुविधा उद्यापासून ‘एमएमआर’ रिजनमधील 109 स्थानकांवर ऑफलाइन प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सकाळी 7 ते रात्री 11 असे 16 तास ही सुविधा उपलब्ध असेल. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज ही माहिती दिली.
मुंबईतील लोकल प्रवासासाठी पालिकेने आज ‘मार्गदर्शक तत्त्वे’ जाहीर केली. यानुसार पालिका क्षेत्रात 53 केंद्रांवर तर मुंबई महानगर प्रदेशातील रेल्वे स्टेशनवर ऑफलाइन पद्धतीने पास मिळवता येणार आहे. सद्यस्थितीत फक्त ऑफलाइन सुविधा राहणार असून लवकरच अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन पास मिळवण्याची सुविधाही दिली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.
असा मिळवा मासिक पास
- 11 ऑगस्टपासून रेल्वे स्थानकांवर लसीकरणाचे दोन्ही डोस झाल्याच्या प्रमाणपत्रांची ऑफलाइन पडताळणी होईल.
- मासिक पाससाठी नागरिकांनी दुसरा डोस घेतल्यानंतर मिळालेल्या प्रमाणपत्राची हार्ड कॉपी, छायाचित्र ओळखपत्र घेऊन रेल्वे स्थानकावर जावे.
- या ठिकाणचे हेल्प डेस्क वैध पुरावे कोविड अॅपवर तपासून पाहील. या ठिकाणी पालिका पिंवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी असतील.
- दोन्ही पुरावे वैध असल्यास पुराव्यांवर विहित नमुन्यातील शिक्का मारण्यात येईल. हे प्रमाणपत्र दाखवून पास घेता येईल. या पासवर प्रवासाची सुविधा 15 ऑगस्टपासूनच मिळेल.
बनावट प्रमाणपत्र आणल्यास कठोर कारवाई
पास मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग नियंत्रण कायदा, आपत्कालीन व्यवस्थापन कायदा, भारतीय दंडविधान संहिता यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.
‘यांना’ नियमित प्रवासमुभा
अत्यावश्यक सेवेतील शासकीय/निमशासकीय आणि इतर कर्मचाऱयांना सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसारच म्हणजेच दोन्ही डोस घेतलेले नसले तरी नियमित रेल्वे प्रवासाची मुभा राहील. गर्दी टाळण्यासाठी तिकीट खिडक्यांच्या प्रमाणात हेल्प डेस्क सुरू करण्यात येतील. यासाठी पालिका नोडल अधिकारीही नेमणार आहे.
मध्य रेल्वेवर 341 तर पश्चिम रेल्वेवर 276 तिकीट खिडक्या खुल्या
दोन लसी घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्यात आली असल्याने अशा प्रवाशांची कागदपत्रे तपासून त्यांना रेल्वे पास मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. मध्य रेल्वेने 75 रेल्वे स्थानकांवर 341 तिकीट खिडक्या उघडण्याची तयारी केली आहे. तर पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते डहाणूदरम्यान 38 रेल्वे स्थानकांवर 276 तिकीट खिडक्या खुल्या ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






























































