
सामना प्रतिनिधी, ठाणे
वडील अंध त्यामुळे आईच्या खांद्यावरच संसाराचा गाडा… घरची हलाखीची परिस्थिती असतानाही तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगले. त्या दिशेने तिची धडपडही सुरू झाली. मात्र अवघ्या वयाच्या 14 व्या वर्षी रेल्वे अपघातात तिने दोन्ही पाय गमावले आणि सर्व स्वप्ने, आशा, आकांक्षा धुळीला मिळाल्या, पण तरीही तिने जिद्द सोडली नाही. यावेळी शिवसेनाच तिच्या मदतीला धावून आली. शिवसेनेच्या प्रयत्नाने तिला कृत्रिम पाय मिळाले. त्यामुळे ती आता पुन्हा भक्कमपणे उभी राहिली आहे आकाशात उंच भरारी घेण्यासाठी…
खासदार निधीतून अत्याधुनिक कृत्रिम पाय
धडपड करण्याच्या ऐन उमेदीच्या उंबरठय़ावर काळाने घाला घातल्याने ती व तिचे कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले. अशावेळी मदतीचा हात दिला तो खासदार राजन विचारे यांनी. तिच्या अपघाताची माहिती कळताच त्यांनी आपल्या खासदार निधीतून 2 लाख 20 हजार रुपयांची तरतूद करून तिला कृत्रिम पाय लावण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. त्याला यश आले असून आज तिला अत्याधुनिक पद्धतीचे कृत्रिम पाय लावण्यात आले. कृत्रिम पायांमुळे ती आज उभी राहिली. यावेळी तिच्या डोळ्यांत तरळत होते ते आनंदाश्रू.
रुनाली मोरे असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या खासदार निधीतून तिला कृत्रिम पाय बसविण्यात आले. त्यामुळे रेल्वे अपघातानंतर ती अवघ्या पाच महिन्यांत पुन्हा आपल्या पायावर उभी राहू शकली. घोडबंदर परिसरात राहणाऱया रुनालीचे वडील अंध आहेत. त्यामुळे चार घरची धुणीभांडी करून आईच घर चालवते. तिचे कष्ट वाया जाऊ नयेत, आईबाबांना आनंदाचे दिवस दिसावेत यासाठी रुनालीने डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, पण गणित हा विषय अवघड जात असल्याने त्याची शिकवणी कुठे चांगली मिळेल या शोधासाठी ती 14 ऑगस्ट 2018 रोजी तिच्या मैत्रिणीसह ठाणे स्थानकाजवळ गेली होती. चौकशी पूर्ण केल्यानंतर डोंबिवलीत राहणाऱया मैत्रिणीला तिने लोकलमध्ये बसवले, पण स्थानकामधील गर्दी पाहून ती घाबरली. यातच तिचा तोल गेला आणि लोकल तिच्या पायावरून गेली. तिने खूप आक्रोश केला, पण तो व्यर्थ ठरला. या अपघातात रुनालीने दोन्ही पाय कायमचे गमावले.



























































