
सामना प्रतिनिधी । मुंबई
मुलुंड येथील फार्मसी कौन्सिलच्या कार्यालयाबाहेर आज सकाळी विद्यार्थ्यांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याचे मुलुंड पोलिसांनी सांगितले.
जवळपास ७०० हून अधिक फार्मसीचे विद्यार्थी त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आज फार्मसी कौन्सिल कार्यालयात आले होते. मोठय़ा संख्येने विद्यार्थी येणार असल्याने तेथे पोलिसांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. सर्वजण रांगेत उभे असतानाच पावणेबाराच्या सुमारास अचानक पाऊस आला. त्यामुळे आसरा घेण्यासाठी विद्यार्थी इतरत्र पळू लागले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. यात आदित्य सिंगाने (२०) आणि आणखी एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी सांगितले.

























































