कोकणात पावसाचा दमदार कमबॅक; बळीराजा सुखावला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचा शुक्रवार पासून दमदार कमबॅक झाल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसाने पाठ फिरवल्याने धोक्यात आलेली भातशेती पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा कधी येतो याकडे शेतकरी डोळे लावून बसला होता. अखेर शुक्रवारपासून पावसाचे जोरदार पुनरागम झाले आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली.

कोकणात पारंपरिक पद्धतीने भातशेती केली जाते. त्यामुळे येथील मुख्य पीक असलेल्या भातशेतीला आवश्यक असा पाऊस होणे गरजेचे असते. जर चांगला पाऊस झाला तर शेतकऱ्यांच्या पदरात चार दाणे पडतात अन्यथा शेतात वर्षभर राबूनही शेतकऱ्यांच्या हाताला फारसे काही लागत नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पावसाच्या लहरीपणाला कंटाळून पारंपरिक शेती करणे सोडून दिली आहे.

पूर्वी कोकणामध्ये भात शेतीबरोबर, नागली, वरी, हरीक, उडीद, तीळ, कुळीथ ही पिके घेतली जात असत. मात्र अलीकडच्या काळात हे सारी पिके इतिहास जमा झाली आहेत. काही प्रमाणात भातशेती वगळली तर तालुक्यातील एकही शेतकरी, नागली, वारी, तीळ किंवा उडिदाची शेती करत नाही. पावसाचा लहरीपणा याला कारणीभूत आहे. शेती करण्यासाठी शेतकऱ्याला जेवढा खर्च येतो त्यातील अर्धा खर्चही शेतीच्या उत्पन्नातून निघत नसल्याने घाट्याचा धंदा करण्यापेक्षा शेती न केलेली बरी अशी मानसिकता आता शेतकऱ्यांची झाली आहे.

गतवर्षी कोकणात झालेल्या अतिवृष्टिमुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते अनेक ठिकाणी शेती वाहून गेली होती तर काही ठिकाणी शेतात माती आल्याने शेतीचे नुकसान झाले होते. यावर्षी नेमकं उलट झालं आहे. यावर्षी सुरवातीपासूनच पावसाने आपला लहरीपणा दाखवला आहे. दरवर्षी 7 ते 10 जून पर्यंत कोकणात दाखल होणारा पाऊस यावर्षी 25 जून पर्यंत दाखल झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना लावणीपूर्व मशागतीची कामे सुरु करता आली नव्हती. 25 जूनला पावसाचे आगमन झाल्यावर पुढील काही दिवस पाऊस चांगला पडला. कोरड्या झालेल्या नद्या, नाले दुथडीभरून वाहू लागले, नैसर्गिक पाणवठे प्रवाहित झाले. पावाचा जोर चांगला असल्याने शेतकऱ्यांनी ही अन्य सारी कामे बाजूला ठेवून लावणीवर जोर दिला, कोसळणाऱ्या पावसाचा फायदा घेत शेतकऱ्यांनी पटापट लावण्या उरकून घेतल्या.

दरम्यान पावसाने पुन्हा लहरीपणा दाखवायला सुरवात केली, धो धो कोसळणारा पाऊस अचानक गायब झाला आणि शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढू लागली. लावणी केलेल्या रोपांना जीव धरण्याआधीच पाऊस गेल्याने शेतीचे होणार काय? हे भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाला. पावसाच्या लहरीपणामुळे कोकणातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला. या दरम्यान पडत असलेल्या कडक उन्हामुळे शेतातील पाणी गरम होऊ लागले त्यापासून शेतीला धोका निर्माण झाला अनेक ठिकाणी भातशेती पिवळी पडू लागली, पावसाअभावी शेतीचे होणारे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहणे शेतकऱ्यांना असह्य झाले होते त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर शुक्रवार सायंकाळपासून कोकणात पावसाने जोरदार कमबॅक केले आणि शेतकऱ्यांची चिंता मिटली. सध्या कोसळत असलेल्या पाऊस हा भातशेतीसाठी अतिशय पोषक असा असल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.