खेडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; नागरिकांची त्रेधातिरिपिट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी दुपारी 3.30 वाजेपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने बरसायला सुरवात केल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे हापूस आणि काजू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. गुरुवारीही तालुक्याच्या काही भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी घरांचे पत्रे उडणे, कौले फुटणे असे प्रकार घडले.

सोसाट्याच्या वाऱ्यासह काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे हा अंदाज खरा ठरेल, असे वाटत नव्हते. मात्र, गुरुवारी सायंकाळी हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला आणि तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पावसाच्या सरी कोसळल्या. गुरुवारी झालेल्या पावसामुळे अनेकांच्या लग्नात विघ्न निर्माण झाले. अचानक सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरु झाल्याने वधु -वराला सुरक्षित स्थळी हलविताना यजमानांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी मंडपात जेवणाची पंगत बसली असतानाच पाऊस बरसू लागल्याने वऱ्हाडी मंडळीला अर्धवट जेवण सोडून सुरक्षित ठिकाणाचा आसरा घ्यावा लागला.

शुक्रवारी सकाळपासून वातावरणात बऱ्यापकी उष्मा होता. त्यामुळे आज पाऊस पडेल, असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र, दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग जमा होऊ लागले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह रिमझिम पावसाने बरसायला सुरवात केली. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेड शहरालगत काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडण्याच्या घटना घडल्या.

ऐन मार्च महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस, काजू, करवंद, जांभूळ या कोकण मेव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे कोकणातील आंबा काजू ही पिके आधीच धोक्यात आली आहेत. त्यात आता पुन्हा अवकाळीचे संकट आल्याने हापूस आणि काजूचे नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.