
राज्यात दिवाळीतही अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला, वाट्टेल तेव्हा पडणाऱ्या पावसाने आणि चक्रीवादळांनी हवीहवीशी वाटणारी थंडीची मजा घालवली आहे. पाऊस गेला असं वाटत असतानाच आता पावसाने ख्रिसमसचीही वाट लावण्याचा बेत आखल्याचे हवामान खात्याच्या अंदाजावरून वाटायला लागले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार ऐन ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबरला पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 22 डिसेंबरपासून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढचे तीन दिवस म्हणजे ख्रिसमसपर्यंत हा पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पाऊस पडू शकतो.
पावसाळा संपल्यानंतरही राज्यात बराच काळ पावसाने मुक्काम ठोकला होता. यामुळे थंडीलाही उशिरा सुरुवात झाली. राज्यातील अनेक भागांमध्ये जरी आता थंडी जाणवायला लागली असली तरी अजूनही सरासरीपेक्षा तापमान हे अधिक आहे. उदाहरण द्यायचे तर आपण पुण्याचे देऊ शकतो. पुण्यामध्ये गुरुवारी 13 डिग्री सेल्सियस तर शुक्रवारी 14 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली होती. असं असलं तरी इथलं किमान तापमान हे डिसेंबरच्या सरासरी तापमानापेक्षा म्हणजे 3 डिग्री सेल्सियसने जास्त होतं.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या दिशेने उष्ण आणि दमट वारे वाहात आहेत. या वाऱ्यामुळेच पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 22 डिसेंबर ls 25 डिसेंबर दरम्यान पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरून येणाऱ्या वारे एकत्र येतील ज्यामुळे हा पाऊस पडेल असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यामुळे या तीन दिवसांत ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असं सांगण्यात आलं आहे. मध्य महाराष्ट्राव्यतिरिक्त विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाच्या सरी कोसळू शकतात असा अंदाज आहे.

























































