वाहरे, जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्ड, चिन्नास्वामी स्टेडियमच्या छतातून पाऊसधारा

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बीसीसीआय आपल्या मैदानांची आणि स्टेडियम्सची किती काळजी घेते याची पोलखोल रविवारी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवरील लढतीप्रसंगी आलेल्या मान्सूनच्या पावसाने केली. हिंदुस्थान – दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात छत गळल्यामुळे स्टेडियममध्ये बसलेले चाहते पार भिजताना दिसले. श्रीनिवासन राममोहन या एका चाहत्याने त्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. दुसरा म्हणाला की, बाहेर नैसर्गिक आणि आत पैशाचा (पेड) पाऊस पडत आहे.

क्रिकेटमधून बोर्डाला मिळते बक्कळ कमाई

बीसीसीआय ही क्रिकेटमधून सर्वाधिक कमाई करणारी जगातली  संस्था आहे. या बोर्डाने  अलीकडेच 2023 ते 2027पर्यंतच्या आयपीएल  मीडिया हक्कांचा सुमारे 48  हजार कोटींमध्ये लिलाव केला आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे प्रमुख सौरभ गांगुली यांनी लिलावातून मिळणारी रक्कम पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. पण गांगुली यांच्या या आश्वासनाची पोलखोल बंगळुरूतील पावसाने चिन्नास्वामी स्टेडियमवरील दुरवस्था उघड करून केली आहे. त्यामुळे क्रिकेटशौकीनांनी बीसीसीआयला सोशल मीडियावरून चांगले ट्रोल केले आहे.

पावसामुळे रद्द झाला सामना

मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना बंगळुरूतील मुसळधार पावसामुळे रद्द झाला आणि मालिका 2 -2 अशी बरोबरीत राहिली. तत्पूर्वी नाणेफेकीनंतर काहीसा पाऊस पडल्याने सामना 19 षटकांचा करण्यात आला. नाणेफेक हरल्यानंतर हिंदुस्थानचे दोन्ही सलामीवीर 28 धावांवर बाद झाले. जेव्हा मुसळधार पाऊस पडला तेव्हा डावाची केवळ 3.3 षटके झाली होती. त्यामुळे हा सामना पंचांना अखेर रद्द करावा लागला.