वादळी पावसाने पत्रे उडाले, वृक्ष कोसळले, वीजपुरवठा खंडित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
भर दिवसा पडलेल्या पावसामुळे दिवसा अंधारून आले

सामना ऑनलाईन,धुळे

शिरपूर तालुक्यातील पळासनेर व खंबाळे परिसरात दुपारी 4 वाजेच्या सुमारास वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. वादळामुळे काही दुकाने व घरांचे पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले. या पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाडय़ामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

आज दुपारी 3 ते 4 वाजेच्या दरम्यान पळासनेर, खंबाळे, आंबा, वरला परिसरात वादळी वारा, विजेचा झगमगाटासह पावसाने अर्धा तास जोरदार हजेरी लावली. पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पहिलाच पाऊस झाल्यामुळे गावातील मुलांनी ओलेचिंब होत आनंद साजरा केला. पळासनेर परिसरात वादळामुळे महामार्गावरील व गावातील टपरी, दुकाने व घरांचे पत्रे उडाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्या परिसरात विजेची बत्ती देखील गूल झाली आहे.

पळासनेर येथील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळील लिंबाचे झाड वादळामुळे विजेच्या तारेवर कोसळले सुदैवाने जीवित हानी टळली. विजेच्या तारा तुटल्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.  शहरात देखील दुपारी 5 वाजेच्या सुमारास 10-15 मिनिटे रिमझिम पावसाने हजेरी लावली. मात्र अल्पसा पाऊस झाल्यामुळे उकाडा अधिक वाढला.

बभळाज परिसरातही पाऊस

तालुक्यातील बभळाजसह परिसरातील तोंदे, तरडी, हिसाळे, अजनाड, होळनांथे आदी गावांमध्ये जोरदार वाऱ्यासह हलक्या स्वरुपाचा पाऊस झाल्याचे बभळाजच्या वार्ताहराने कळविले. वादळी वाऱ्यामुळे  पुठे नुकसान झाल्याचे वृत्त नसून गारवा पसरल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस अर्धवट स्वरुपाचा असल्याने उकाडा वाढणार आहे.

मशागतीला फायदा

या पावसामुळे शेती मशागतीला फायदा होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी पत्रे उडाले तर वृक्षही कोसळले.वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता. मात्र कर्मचाऱ्यांनी तो सुरळीत केला.