
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात इमाने इतबारे सेवा करणाऱया वन कर्मचाऱयांना पावसातही तितक्याच जोमाने काम करता यावे यासाठी जनसहयोग फाऊंडेशनच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. जवळपास 200 वन कर्मचाऱयांना रेनकोटचे वाटप फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे.
जनसहयोग फाऊंडेशन व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी वन कर्मचाऱयांना उच्च दर्जाचे रेनकोट देण्यात येणार आहेत. उद्यानातील माहिती कक्षात हा रेनकोट वाटपाचा कार्यक्रम दुपारी 12.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या हस्ते वन कर्मचाऱयांना रेनकोटचे वाटप करण्यात येईल. याप्रसंगी उद्यानाचे संचालक डी. मल्लिकार्जुन, उपवनसंरक्षक रेवती कुलकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र मुठे आणि संतोष पंक याशिवाय फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर पवार तसेच मिलन मेहता व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.






























































