कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचे आगमन; शेतीची खोळंबलेली कामे सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी असल्याने चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या चार-पाच दिवसांपासून जिह्यात पावसाने ठिकठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. कधी ऊन, तर कधी पाऊस असा खेळ सुरू असल्याचे चित्र असले, तरी जिल्हा ओलाचिंब होऊ लागला आहे. शेतीची ही खोळंबलेली कामे सुरू झाली आहेत. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांत काही ठिकाणी दमदार झालेल्या पावसामुळे नागरिकांना नद्यांद्वारे गढूळ पाणीपुरवठा होऊ लागला आहे.

कोल्हापूर जिह्यात गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टीमुळे पूरस्थिती ओढवली होती. यंदाही जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता; परंतु सुरुवातीच्या वळिवाच्या पावसाचा तडाखा वगळता जूनमध्ये सरासरीच्या अवघ्या 29 टक्के पाऊस झाला. गेल्या वर्षी जूनच्या मध्यातच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडून पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. यावेळी मात्र जूनमधील सर्व नक्षत्रे कोरडी गेली. धरणांचा पाणीसाठा जेमतेम 20 ते 30 टक्के राहिला, तर शेतकऱ्यासमोरही दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊन यंदा जिह्यावर दुष्काळाचे सावट पसरले होते. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून जिह्यात ठिकठिकाणी कधी दमदार, तर कधी तुरळक पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

गगनबावडय़ात काल 59.6 मि.मी. पाऊस
जिह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 59.6 मिमी पावसाची नोंद झाली, तर सकाळी 11 पर्यंतच्या 24 तासांत हातकणंगले-6.5, शिरोळ- 3.9, पन्हाळा- 16.9, शाहूवाडी- 15.3, राधानगरी-20.6, गगनबावडा- 50.6, करवीर- 10.9, कागल- 7.9, गडहिंग्लज- 10.1, भुदरगड- 30, आजरा- 17.2, तर चंदगड तालुक्यात 17.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.