राज्यात दोन दिवस पावसाचे; मुंबईसह ठाणे, रायगडला सतर्कतेचा इशारा

अवकाळी पावसाने राज्यात काही ठिकाणी उष्णतेपासून सुटका झाली असली तरी मुंबई आणि परिसरात वाढत्या आर्द्रतेमुळे प्रंचड उकाडा जाणवत आहे. तसेच आता पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह मुंबईत पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काही भागात गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत शनिवारी सकाळपासून वांद्रे, अंधेरी, बोरिवली आणि गोरेगाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या होत्या. पुढील दोन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तर काही ठिकाणी गडगडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तर कोकणातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

गुजरात आणि उत्तर कोकणच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच यावेळी 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असंही हवामान विभागाने सांगितलं आहे. अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातही पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.