पिण्याच्या पाण्यासाठी उन्हाची वाट बघावी लागते; रायपूर (खडकी) गावकऱ्यांच्या वाटेला वेदना!

चंद्रपुर जिल्ह्यातील जीवती तालुक्यात रायपूर (खडकी) गावात पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास भोगावा लागत आहे. रायपूर (खडकी) गावातील लोकसंख्या जेमतेम 150 आहे. या गावाला डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला जातो. उन नसल्याने गावकऱ्यांना पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे तब्बल दोन किलोमीटर अंतर गावकऱ्यांना पायपीट करावी लागते.

गावाच्या पायथ्याशी असलेल्या या विहिरीला सोलार मोटर बसविण्यात आल्या आहेत. तिथून गावातील नळांना पाणी पुरविण्यात येते. मात्र सध्या ढगाळ वातावरण असल्याकारणाने सोलार मोटर चालत नाहीत व परिणामी गावचा पाणी पुरवठा ठप्प होतो. पाण्यासाठी गावकऱ्यांना दररोज डोंगर चढ उतार करावा लागतो. अनेकदा कुटुंबातील लहान किंवा वयस्कर मंडळींना सुद्धा पायपीट करावी लागते. अशा मध्ये काही वेळेस पाय घसरुन पडल्याच्या घटना ही घडल्या आहेत. त्यामुळे विहिरीवर विद्युत मोटर पंप बसवावे अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.