
केंद्र सरकारने माजी हिंदुस्थानी प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी राज कुमार गोयल यांची केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी गोयल यांना पदाची शपथ दिली. गोयल हे माजी मुख्य माहिती आयुक्त हिरालाल समरिया यांची जागा घेतील.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरालाल समरिया यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर १३ सप्टेंबरपासून मुख्य माहिती आयुक्तपद रिक्त होते. माजी आयएएस अधिकारी राज कुमार गोयल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी सोमवारी नवीन माहिती आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती मुर्मू यांनी गोयल यांना पदाची शपथ दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस केली होती.
कोण आहेत राज कुमार गोयल?
राज कुमार गोयल हे अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम-केंद्रशासित प्रदेश (AGMUT) कॅडरचे १९९० च्या बॅचचे (निवृत्त) हिंदुस्थानी प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. ते ३१ ऑगस्ट रोजी कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागात सचिव म्हणून निवृत्त झाले. त्यांनी गृह मंत्रालयात सचिव (सीमा व्यवस्थापन) म्हणूनही काम केले असून केंद्र आणि जम्मू आणि कश्मीरमध्येही महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

























































