राज कुंद्रा पॉर्न प्रकरण – बलात्काराचेही व्हिडीओ चित्रीत केले, पीडित तरुणींची पोलिसांना माहिती

राज कुंद्रा पॉर्न रॅकेट प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राज कुंद्रा याच्या हॉटशॉप अॅपसाठी बनविण्यात येणाऱ्या व्हिडीओसाठी ज्या मुलींचा वापर केला जायचा त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांचा पाढाच पोलिसांसमोर वाचला आहे. या पीडित मुलींवर शूटींग दरम्यान त्यांच्यावर बलात्कार देखील केले जायचे व त्यावेळी त्याचेही शूटींग करून ते व्हिडीओ विकले जायचे. अशी धक्कादायक माहिती या तरुणींनी दिली आहे. मिरर नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

मिरर नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या ऑडिशनचे पोस्ट टाकले जायचे. ते पाहून ज्या मुली यायच्या त्यांच्यासमोर सुरुवातीला खोटे ऑडिशन केले जायचे व एका एका ऑडिशननंतर सिनमधील अश्लीलता वाढत जायची. त्यानंतर जर एखाद्या मुलीने ऑडिशन सोडून जायचे म्हटले की तिला आयोजकांकडून धमकावले जायचे. तिच्यावर खटला दाखल करू, अश्लील फोटो व्हायरल करू अशी भीती घातली जायची. त्यामुळे मुली नाईलाजाने तेथे थांबायच्या व त्यातूनच अनेक मुली या पॉर्न रॅकेटच्या जाळ्यात अडकल्या होत्या.

अखेर धमकवल्यामुळे शूटींगसाठी तयार झालेल्या मुलींवर सेटवरील कर्मचारी, अभिनेते यांच्याकडून बलात्कार देखील केला जायचा व त्यावेळी त्याचेही व्हिडीओ शूट केले जायचे. हे सगळं झाल्यावर त्या मुलीला दहा हजार रुपये देऊन तेथून पाठवून दिले जायचे, असे एका तरुणींने पोलिसांना सांगितले.

शेकडो फिल्म बनवून कोटय़वधी कमावले

राज कुंद्रा याने त्याच्या सहकाऱयांच्या मदतीने शंभरहून अधिक पॉर्न फिल्म बनवल्या होत्या असं पोलिसांना कळालं आहे. त्यातून कोटय़वधीची कमाई करणाऱ्या कुंद्राने अनेक फिल्म डिलिट केल्या आहेत. त्या डिलिट केलेल्या फिल्म पुन्हा रिट्राइव्ह करीत आहोत. चित्रपटात नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणींना हेरून त्यांच्या पॉर्न फिल्म बनविणारा राज कुंद्रा याला गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने अटक केली होती. कुंद्राने त्याचा लंडनस्थित भावोजी आणि पॉर्न फिल्म प्रकरणातला वॉण्टेड आरोपी प्रदीप बक्षी याच्या मदतीने शेकडो पॉर्न फिल्म ‘हॉटशॉट’ अॅपच्या माध्यमातून प्रसारित केल्यात. या अश्लील उद्योगातून कुंद्राने रग्गड पैसा कमावला. राज कुंद्राने ज्या पॉर्न फिल्म डिलिट केल्यात त्या आम्ही पुन्हा मिळविण्याचा सायबरतज्ञांच्या मदतीने प्रयत्न करीत आहोत, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

हिंदुस्थानात पॉर्नवर बंदी कशाला ? अभिनेत्रीने विचारला सवाल

एकेकाळी सलमान खानसोबत चित्रपटात झळकलेल्या सोमी अली हिला या प्रकरणामुळे धक्का बसण्याऐवजी आश्चर्य वाटलं आहे. ज्या देशात कामसुत्राचा उगम झाला त्या देशात पॉर्नवर बंदी कशाला असा प्रश्न सोमीने विचारला आहे. पॉर्न चित्रपट बनवणाऱ्यांच्या, त्यात काम करणाऱ्यांच्या मी विरोधात नाही असंही तिने म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या