
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही हिंदूंच्या विरोधी असल्याची टीका हिंदू महासंघाने केली आहे. राज्यात भोंग्यांवरून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू असताना आता राज ठाकरे यांच्या भूमिकेचा हिंदूंनाच त्रास सहन करावा लागत असल्याचे हिंदू महासंघ्याच्या दवे यांनी म्हटले आहे.
आनंद दवे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला असून त्यांनी सडकून टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली. ‘त्यांनी भोंगे उतरवले तर आम्ही भोंगे उतरवू, मांडव काढू, आरत्या कमी करू ही भूमिका राज ठाकरे घेत आहेत ती संपूर्ण चुकीची आणि हिंदू समाजाचं नुकसान करणारी आहे’, अशी टीका दवे यांनी केली.
‘भोंग्याच्या प्रश्न त्यांना कुठपर्यंत न्यायचा आहे तो त्यांनी न्यावा. मात्र मंदिरातील पूजा, आरत्या, इथले कार्यक्रम अशा हिंदूंच्या गोष्टींवर संक्रात येऊ नये याची काळजी देखील राज ठाकरेंनी घ्यावी’, अशी ठाम भूमिका त्यांनी यावेळी मांडली.






























































