राजधानीचा प्रवास अवघ्या दहा तासांत होणार! रेल्वे मार्ग आधुनिकीकरणाला अखेर मंजुरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rajdhani-express-central-railway

पश्चिम रेल्वेच्या प्रतिष्ठत राजधानी एक्स्प्रेसच्या वेगात वाढ करण्याचा प्रकल्प अखेर मंजूर करण्यात आला आहे. मुंबई ते दिल्ली अंतर चार तासांनी कमी होणार असून अवघ्या दहा तासांत दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या योजनेला गेल्या आठवडय़ात मंजुरी दिली आहे.

राजधानी एक्स्प्रेसला सध्या मुंबई ते दिल्ली हे अंतर कापण्यासाठी 15 तास 50 मिनिटांचा अवधी लागतो. देशाच्या आर्थिक आणि राजकीय राजधानीच्या शहरांना जोडणारी ही देशातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. मुंबई ते दिल्ली हे 1483 कि.मी.चे अंतर (बडोदा ते अहमदाबाद धरून) प्रति तास 160 कि.मी.च्या वेगाने कापण्यासाठी या मार्गांचे आधुनिकीकरण करण्याच्या अनेक वर्षांपासून असलेल्या मागणीला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला आहे.

6806.44 कोटींचा खर्च होणार!
राजधानीच्या रेल्वे मार्गाच्या संपूर्ण आधुनिकीकरणासाठी 6806.44 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे. त्यातून ट्रकसह संपूर्ण सिग्नल यंत्रणेचे अत्याधुनिकीकरण होणार आहे. त्यामुळे ही गाडी ताशी 160 कि.मी. वेगाने धावणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाला कॅबिनेटने मंजुरी दिल्यामुळे टेंडर निघून प्रत्यक्षात कामाचे वाटप होणार असून चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.