सीसीटीव्ही फुटेज देण्यासाठी टाळाटाळ, ईव्हीएम मशीन चार वेळा सुरू का केली? राजन विचारे यांचा सवाल

ठाणे जिह्यातील कोपरी-पाचपखाडी, ठाणे विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम पडताळणीदरम्यान मशीनमध्ये आधीपासूचन बॅटरी असणे तसेच ईव्हीएम चार वेळा सुरू केल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत लपवाछपवी का सुरू आहे? सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ का केली जात आहे, असा सवाल शिवसेना नेते राजन विचारे यांनी केला आहे.

कोपरी-पाचपखाडी, ठाणे मतदारसंघातील ईव्हीएम पडताळणीत काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. ठाणे विधानसभा मतदारसंघातील 68 नंबर केंद्राच्या ईव्हीएम पडताळणीत मशीनच्या प्रक्रियेमध्ये तफावत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, ठाणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून उमेदवार राजन विचारे व केदार दिघे यांच्या मतदारसंघातील ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रिया समाधानकारक पार पडली असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजन विचारे यांनी म्हटले आहे.

ईव्हीएम पडताळणीबाबत संभ्रम

निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचनांनुसार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या बर्न्ट मेमरी आणि मायक्रोपंट्रोलर याची तपासणी व पडताळणी करण्यात आली. मात्र, ही कार्यपद्धती कशी असणार याचे सादरीकरण व माहिती उमेदवार प्रतिनिधींना लेखी द्यावी अशी मागणी राजन विचारे यांनी एका पत्राद्वार केली होती. परंतु ही माहिती अखेरपर्यंत न देता जाणीवपूर्वक याबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला.

ठाणे विधानसभा मतदान केंद्र क्रमांक 68 वरील ईव्हीएम मशीनमध्ये बॅटरी मिळाली. त्याचबरोबर ईव्हीएम मशीन सिम्बॉल लोडिंग,  मतदानाच्या दिवशी मॉक पोल आणि मतदानाला सुरुवात करताना अशी तीन वेळा सुरू असावी लागते.

परंतु ही मशीन चार वेळा सुरू झाल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी उमेदवार प्रतिनिधींनी आक्षेप घेतल्यानंतर फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱयांकडून तसे नमूद करण्यात आले.

मतदान केंद्रावर चौथ्या वेळी मशीन पुणी व का सुरू केले याचे सीसी फुटेज व कागदपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी राजन विचारे यांनी ठाणे जिल्हा निवडणूक विभागाकडे पत्राद्वारे केली आहे.