चाकरमान्यांचा महामार्गावरील प्रवास यंदाही खडतर, चिपळूण ते राजापूर दरम्यान खड्डेच खड्डे

गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावी येऊ लागले आहेत. यंदाही चाकरमान्यांच्या नशिबी मुंबई-गोवा महामार्गाचा खडतर प्रवास आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण ते राजापूर दरम्यान खड्ड्यांचा प्रवास आहे. एकीकडे चौपदरीकरणाचे काम आणि दुसरीकडे खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. यातूनच मार्ग काढत चाकरमान्यांना घर गाठावे लागत आहे.

गणेशोत्सव हा कोकणातला मोठा सण. या सणासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी येतात. कोकण रेल्वेच्या गाड्या फुल्ल झाल्यामुळे चाकरमान्यांना आता एसटी बस, खासगी बस आणि खासगी वाहनांवर अवलंबून रहावे लागत आहे. गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेक ठिकाणी खोदकाम झाले आहे. पावसात रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले, परशुराम ते आरवली दरम्यान 34.45 किमी रस्त्यापैकी 33.15 किमी रस्त्याचे कॉक्रिटीकरण झाले आहे. 1.20 किमी डांबरी रस्ता आहे. या रस्त्यावर 100 मीटरमध्ये खड्डे आहेत. त्यानंतर आरवली ते कांटे हा 39.24 किमीचा रस्ता आहे. त्यापैकी 23 किमीचे काँक्रिट करण झाले आहे. 16.24 किमीचा रस्ता डांबरी आहे. या पट्ट्यातील खड्डे भरण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. कांटे ते वाकेड दरम्यान 49.15 किमीचा रस्ता आहे. 25.85 किमीचे कॉक्रिटीकरण झाले आहे. 22 किमीचा रस्ता डांबरी आहे. या दरम्यान 500 मीटर रस्त्यावर खड्डे आहेत. महामार्गावरील खड्डे भरण्याचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. काही प्रमाणात खड्डे भरल्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास काही काळ सुखकर होईल. मात्र चौपदरीकरणाचे सुरु असलेले काम आणि काही मार्गावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचा प्रवास खडतर होणार आहे.