
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील राजकीय वातावरण तापत आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला गती दिली आहे. त्यातच वसुंधरा राजे यांच्यामुळे राजस्थानात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. तर भाजप आणि काँग्रेसमध्ये आतापासूनच मुख्यमंत्रीपदाच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केले होते. यानंतर आता मुख्यमंत्रीपदापेक्षा निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे, असे सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता गेहलोत- पायलट यांनी आपसातील संघर्षाला पूर्णविराम देत निवडणुका जिंकण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना आपण मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार आहोत. मात्र, मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मला सोडण्यास तयार नाही, असे विधान अशोक गेहलोत यांनी केले होते. यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क केले जात आहेत. यावर सचिन पायलट पलटवार करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यांनी गेहलोत यांच्या विधानावर प्रतिक्रिया न देता निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे म्हटले आहे. राजस्थानची जनता परंपरा मोडण्यास इच्छूक आहे. आमच्या पक्षाला पुन्हा संधी मिळेल. मुख्यमंत्री कोण होणार, यापेक्षा निवडणूक जिंकण्याला प्रथम प्राधान्य असल्याचे सचिन पायलट यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील संघर्ष सातत्याने उघड होत असतो. त्यातच आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांमधील संघर्ष वाढू नये, यासाठी प्रयत्न होत आहे. याबाबत सचिन पायलट म्हणाले की, मल्लिकार्जुन खरगे मला म्हणाले की, तुम्हाला आता हे सगळे विसरावे लागेल. झाले गेले विसरून एकत्र काम करावे लागेल. माफ करून पुढे जावे लागेल. एकदा बोललेला शब्द परत घेता येत नाही. मात्र, आता त्यापलीकडे जाऊन एकत्र काम करावे लागेल, असे पायलट म्हणाले.
आता सचिन पायलट निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. काँग्रेसचे सरकार पुन्हा आल्यास तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळू शकेल का, या प्रश्नावर बोलताना, सध्या निवडणुका जिंकणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आधी निवडणुका जिंकू. मग काय होईल ते दिसेल. भाजपची कोंडी झाली आहे. वसुंधरा राजे यांना त्यांच्याच पक्षात बाजूला केले जात आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचे सचिन पायलट म्हणाले.



























































