काँग्रेसनंतर आता राजस्थान भाजपमध्येही धुसफूस, वसुंधरा राजे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण

राजस्थान काँग्रेसमध्ये बंडाळी सुरू असतानाच आता भाजपमध्येही धुसफूस सुरू असल्याचे समोर आले आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या नाराज असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही वर्षात वसुंधरा राजे यांच्याकडे राज्यातली कोणतीही जबाबदारी न सोपवल्यामुळे त्या नाराज असल्याचे बोलले जात आहे.

2018च्या विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यापासून वसुंधरा राजे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या सक्रीय राजकारणातून अगदी बाजूला सारल्या गेल्या आहेत. भाजपने गुलाबचंद कटारिया यांना 2019 मध्ये विरोधी पक्ष नेते व सतीश पुनिया यांना प्रदेशाध्यक्ष केलं. 2020 मध्ये ऑपरेशन लोटस आखण्यात आले होते. मात्र त्यातही वसुंधरा राजे यांना कोणतीही जबाबदारी दिली नव्हती.

राजस्थान विधानसभा निवडणूकीला अवघे काही महिने उरले आहेत त्यामुळे भाजप राजस्थानमधील नाराजांची नाराजी दूर करण्याच्या मागे लागला आहे.