
जयपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एक व्यक्ती बायकोला ‘आदीपुरुष’ सिनेमा दाखविण्यासाठी थिएटरमध्ये घेऊन गेला आणि मध्यांतरात असे काही झाले ज्याची त्याला कल्पनाही नव्हती. त्याची बायको पळाली होती. लग्नाच्या अवघ्या सात दिवसानंतर ही घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
आदर्श नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानाराम रिंगस येथील रहिवासी आहे. रींगस हा जयपूरच्या आदर्श नगर परिसरातील जवळपास 100किमी दूर आहे. कानाराम आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्याकाही दिवसांपासून मतभेद सुरु होते. त्यामुळे पत्नीला थोडे खुश करण्यासाठी तिला फिरवण्यासाठी तो जयपुरला आला होता. जयपूरमध्ये शॉपिंग केली, मोठ्या रेस्टॉरेण्टमध्ये जेवायला नेले. त्यानंतर दोघं आदर्श नगर येथील पिंक स्क्वायर मॉलमध्ये ‘आदीपुरुष’ सिनेमा पाहण्यासाठी गेले. मात्र मध्यांतर झाल्यानंतर पत्नीने कानारामला तहान लागलीय आणि पॉपकॉर्नही खायचे असल्याचे सांगितले. ते घेऊन येण्यासाठी कानाराम बाहेर गेला आणि जेव्हा पॉपकॉर्न घेऊन आला त्यावेळी पत्नी जागेवर नव्हती. आजुबाजुच्या लोकांना विचारले त्यावेळी त्यांनी बाहेर गेल्याचे सांगितले. कानारामने आधी सिनेमागृहातील वॉशरुममध्ये तपासले त्यानंतर एकाने ती सिनेमागृहाच्या बाहेर गेल्याचे सांगितले.
कानाराम धावत सिनेमागृहाच्या बाहेर आला. जवळच्या ट्रान्सपोर्ट नगर जवळ पोहोचला तिथे बसस्टॉप होता, जिथे दिल्ली, हरयाणासह अन्य राज्यात जाण्यासाठी बस मिळतात. तिथे चौकशी केली असता त्याची पत्नी दिल्लीला जाणाऱ्या बसमध्ये बसून निघून गेली. त्याने तत्काळ ती बस थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र ती बस खूप दूर गेली होती. त्याने आदर्श नगर पोलीसांना माहिती देऊन तक्रार दाखल केली आहे. पत्नीकडे जो फोन होता तोही बंद येत होता. पोलिसांनी पत्नीचे माहेर विचारल्यावर तिचे जयपुरच्या शाहपुरा परिसरात असल्याचे सांगितले. पोलिसांचे पथक तिथे पोहोचून चौकशी केली असता रेखा कानारामसोबत आनंदी नव्हती, तिच्या मनाविरोधात हे लग्न करण्यात आले होते. त्यामुळे ती माहेरी आली होती. पोलिसांनी सांगितले की, हे लग्न 25 जूनला झाले होते आणि अवघ्या 7 दिवसानंतर ते फिरायला आले होते.



























































