
महिलेचा सोशल मीडियावरील फोटो एडीट करून व्हायरल करणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. तीन वर्षे सोशल मीडियाचा वापर करायचा नाही, अशी सक्त ताकिद देत राजस्थान उच्च न्यायालयाने या तरुणाला जामीन मंजूर केला आहे.
न्या. अशोक जैन यांनी हा सशर्त जामीन मंजूर केला. 23 वर्षीय विवाहितेचा एडीट केलेला फोटो सोशल मीडियावरून डिलिट करावा. पीडितेच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क ठेवू नये. तसेच पुढील तीन वर्षे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडिया अॅपवर लॉग इन करायचे नाही, असेही न्यायालयाने या तरुणाला बजावले आहे.
प्रतिज्ञापत्रावर हमी देण्याचे आदेश
महिलेचा फोटो किंवा व्हिडिओ आहे की नाही याची माहिती प्रतिज्ञापत्रावर तरुणाने सादर करावी. तसेच अटींचे उल्लंघन केल्यास जामीन रद्द केला जाईल, असा सज्जड दम न्यायालयाने तरुणाला दिला आहे.
काय आहे प्रकरण
आरोपीने बनावट अकाउंट उघडले. एका विवाहितेचा फोटो एडीट करून व्हायरल केला. तरुणाला अटक झाली. मात्र आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा करत तरुणाने जामिनासाठी याचिका केली होती.
पोलिसांचा विरोध
तरुणाच्या जामिनाला पोलिसांनी विरोध केला होता. तरुणाच्या कृतीमुळे महिलेच्या वैवाहिक जीवनावर परिणाम झाला आहे. असा गंभीर गुन्हा करणाऱ्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद पोलिसांनी केला होता.