
कितीही कडक कायदे केले किंवा बलात्काराच्या आरोपींना फाशी झाली तरीही महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी झालेल्या नाहीत. देशात सध्या राजस्थानमध्ये सर्वाधिक बलात्कार होत असल्याची नोंद झाली आहे. एकीकडे राजस्थानमधील बलात्काराच्या आकड्यांनी चिंता वाढवली असताना दुसरीकडे राजस्थानचे मंत्री शांती धारीवाल यांनी एक संतापजनक विधान केले आहे.
बुधवारी देशभरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा होत असताना राजस्थानचे मंत्री शांती धारीवाल यांनी वादग्रस्त विधान केले. महिलांवरील अत्याचाराच्या बाबत राजस्थान पहिल्या नंबरवर पोहोचल्यानंतर शांती धारीवाल यांनी राजस्थान हा मर्दांचा प्रदेश असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांसह महिला नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विधानसभेमध्ये बोलताना शांती धारीवाल हे राजस्थानमधील बलात्काराची आकडेवारी सादर करत होते. राजस्थान बलात्काराच्या घटनांमध्ये पहिल्या नंबवर पोहोचला आहे. कुठे न कुठे काहीतरी चूक होतेय, पण राजस्थान हा मर्दांचा प्रदेश आहे. आता त्याचा काय करायचे, असे ते म्हणाले. विशेष म्हणजे या लाजिरवाण्या विधानावर काँग्रेस आमदारांनीही हसत माना डोलावल्या. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विधानसभेच्या यूट्यूब चॅनेलवरून तो हटवण्यात आला आहे.
भाजपचा प्रियंका गांधींना सवाल
राजस्थानमधील भाजपचे नेते डॉ. सतिश पुनिया यांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना थेट सवाल केला आहे. राजस्थान बलात्काराच्या घटनांमध्ये नंबर एक झाल्यानंतर काँग्रेसच्या मंत्र्यांनी दिलेले विधान महिलांचा अपमान करणारे असून यामुळे पुरुषांच्याही माना खाली झुकल्या आहे. प्रियंका गांधी यावर काही बोलणार की नाहीत? असा सवाल पुनिया यांनी केला.
आकडेवारी
राजस्थानमध्ये 2021 मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची संख्या 21 हजार 832 वर पोहोचली होती. याचाच अर्थ दिवसाला 60 महिला नराधमांच्या शिकार झाल्या. बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनाही सातत्याने वाढत आहेत. राजस्थानमध्ये 2021 मध्ये बलात्काराच्या 6 हजार 337 तर छेडछाडीच्या 9 हजार 79 प्रकरणे समोर आली. तर अपहरणाची 5 हजार 964 आणि हुंडाबळीच्या 452 घटना समोर आल्या.




























































