राजस्थानमध्ये तापमानाचा कहर, गेल्या चोवीस तासात 12 लोकांचा उष्माघाताने मृत्यू

यंदाचा उन्हाळा मे महिन्यातील सर्व विक्रम मोडत आहे. राजस्थानमध्ये इतका भीषण उकाडा आहे की, इथल्या अनेक भागात 45 डिग्रीच्यावर तापमान गेले आहे. तापमानाचा पारा वाढल्याने येथे उष्माघाताच्या प्रकारातही वाढ होत आहे. गेल्या चोवीस तासात राजस्थानच्या विविध भागात 12 हून अधिक लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. अनेकांची प्रकृती गंभीर झाली आहे.

राजस्थानच्या जालोर जिल्ह्यात सूरजदान, सोनाराम, कमला देवी आणि पोपटराम यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. याशिवाय बालोतरा रिफायनरीमध्ये दोन मजूर हीरसिंह आणि मूलाराम यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. बीकानेरच्य़ा महाजन फायरिंग केंजमध्ये एका सैनिकाचा उष्माघातने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर भीलवाडा आणि जोधपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये दोन ते तीन तासांची वीज कापली जात आहे.

जयपूरच्या हवामान विभागानुसार, सध्या तरी राजस्थानमध्ये उष्णतेची लाट तशीच राहणार आहे. अशातच उकाडा कायम राहणार असून तापमानही वाढेल. हवामान विभागाने प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी केला आहे. तसेच  लोकांना सांगण्यात आले आहे की, वाळवंटी भागात, विशेष करुन पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये तापमान 50 अंशांच्या आसपास असू शकते.