
राजस्थानमध्ये एका नववधूचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ती आपल्या पतीसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाली होती. दरम्यान बुधवारी रात्री बसने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. या अपघातात महिलेच्या माहेरी आणि सासरी शोककळा पसरली होती. लग्न होऊन अवघे अडीच महिनेच झाले होते. त्यामुळे नवऱ्याला या घटनेने प्रचंड धक्का बसला आहे.
अंजली असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री जवळपास 8च्या सुमारास अंजली आणि तिचा पती कुलदीप बाइकने नातेवाईकांकडे जात होते. दरम्यान जयपूरहून येणाऱ्या बसने अंजलीच्या बाईकला जोरदार धडक दिली. बसच्या धडकेत तिचा नवरा कुलदीप रस्त्याच्या कडेला पडला तर अंजली रस्त्याच्या मधोमध पडली आणि त्याच बसच्या चाकाखाली आली. जशी या घटनेची माहीती त्यांच्या कुटुंबियांनी मिळाली घरात एकच शोककळा पसरली. रात्री उशिरापर्यंत कुटुंबीय व समाज काकरिया रोडवर बसून होते. त्याने वाहतूक खोळंबली होती. पोलीस अधिकाऱ्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकले नाहीत. या रस्त्यावर दुभाजक करून नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी होती. नंतर पोलीस अधिकाऱ्यांनी हा प्रकार समजावून सांगितल्यावर ते जागेवरून उभे राहिले.
दरम्यान अंजलीचा मृतदेह जेएलएन रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. गुरुवारी मृतदेहाचे शवविचछेदन करण्यात आले. स्थानिकांनी सांगितले की, अंजलीचे अडीच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तिला आणि नवऱ्याला दोघांनाही वडिल नव्हते. दोघं हनीमूनला जाणार होते पण त्याआधीच त्यांचा अपघात झाला आणि पत्नीचा मृत्यू झाला.



























































