हा देवाचाच इशारा समजतो! ‘सुपरस्टार’ रजनीकांत यांची राजकारणातून माघार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दाक्षिणात्य अभिनेते आणि ‘सुपरस्टार’ रजनीकांत यांनी राजकारणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येतीच्या कारणावरून राजकारणात प्रवेश न करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मंगळवारी सोशल मीडियावर रजनीकांत यांनी एक पत्रक शेअर करत याबाबत घोषणा केली.

तमिळनाडूमध्ये 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करण्याचा आणि जानेवारीत पक्ष लॉन्च करण्याचा निर्णय रजनीकांत यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र आता तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी राजकारणातून मागे हटण्याची घोषणा केली. परंतु तमिळनाडूच्या लोकांसाठी आपण पुढेही काम करत राहणार असल्याचेही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.

देवाचाच इशारा!

रजनीकांत यांनी पत्रकात म्हटले की, ‘गेल्या काही दिवसांमध्ये तब्येतीसंदर्भात जे काही घडले, तो मी देवानेच दिलेला इशारा समजतो. त्यामुळे 2021 मध्ये होऊ घातलेली तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याचा विचार रद्द करत आहे.’ चाहत्यांना आशेला लावून पुन्हा माघार घेतल्याने रजनीकांत यांनी माफीही मागितली आहे.

चित्रिकरणादरम्यान तब्येत बिघडली

काही दिवसांपूर्वी रजनीकांत हैद्राबाद येथे आपल्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण करत असताना अचानक त्यांची तब्येत खालावली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. थोड्या दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्यांनी आज एक पत्रक शेअर करत राजकारणात येणार नसल्याचे जाहीर केले.

कमल हसन यांनी दिली प्रतिक्रिया

दरम्यान, रजनीकांत यांच्या राजकारणात न येण्याच्या निर्णयावर एस. गुरुमुर्ती आणि कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या जनतेची सेवा करत राहणार असल्याचे म्हटले असून याचा राज्याच्या राजकारणावर नक्कीच प्रभाव पडेल, असे एस. गुरुमुर्ती यांनी म्हटले. तर या निर्णयामुळे दु:ख झाले असून आरोग्याचा प्राधान्य आहे, अशी प्रतिक्रिया कमल हसन यांनी दिली.