राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनीला परोल मंजूर

42

सामना ऑनलाईन | चेन्नई

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नलिनीला मद्रास उच्च न्यायालयाने परोल मंजूर केला आहे. नलिनीने तिच्या मुलीच्या लग्नासाठी मद्रास उच्च न्यायालयाकडे सहा महिन्यांच्या परोलची मागणी केली होती मात्र न्यायालयाने तिला 30 दिवसांचा परोल मंजूर केला आहे.

पॅऱोलच्या मागणीसाठी स्वत: न्यायालयात हजर राहिलेल्या नलिनीने तिच्या दोन्ही मुलींसाठी तिला काहीही करता आले नाही याची खंत व्यक्त केली. ‘मी व माझे पती दोघेही कैद असल्यामुळे आम्हाला मुलींसाठी काहीही करता आले नाही. आम्ही त्यांचे नामकरण केले नाही. ना त्यांची काळजी घेतली नाही, त्यांना चांगले शिक्षण देऊ शकलो नाही. तुम्ही जर पॅरोल मंजूर केलात तर किमान मला मुलीच्या लग्नाची व्यवस्थित तयारी करता येईल’, असे नलिनीने न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने तिला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. तसेच नलिनीच्या पॅरोलच्या निर्णयावर येत्या दहा दिवसात अंमलबजावणी करण्याचे आदेश न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला दिले आहे. पॅरोलच्या काळात ती कुठे आणि कुणासोबत राहणार याची माहिती घेण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.पॅरोलच्या काळात नलिनीला कोणत्याही माध्यमांना, राजकीय पक्षाला तसेच इतर कोणत्याही संस्थांना मुलाखत देऊ नये अशी सक्त ताकीद न्यायालयाने दिली आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 21 मे 1991 रोजी श्रीपेरुंबद्दूर येथे हत्या झाली होती. या प्रकरणातील दोषी पेरारिवेलन, मुरुगन, नलिनी, शांतन, रविचंद्रन, जयकुमार आणि रॉबर्ट प्यास यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली असून ते गेल्या 30 वर्षांपासून तुरुंगात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या