पक्ष फुटीच्या भीतीमुळे भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण – राजीव सातव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । हिंगोली

गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या तीन आमदारांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून पक्षाच्या सरकारला घरचा आहेर दिला असून पक्ष फुटण्याच्या भीतीमुळे भाजपा प्रलोभने देऊन विरोधी आमदारांना फोडत घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी व हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते व आमदार कुमार बावलिया यांनी काँग्रेसचा तसेच आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बावलिया भाजपामध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर हिंगोली येथे गुजरात काँग्रेसचे प्रभारी खासदार राजू सातव यांना विचारले असता ते म्हणाले की, गुजरात मध्ये भाजपने घोडे बाजार आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. भाजपच्या जुमलेबाज सरकारवर जनता नाराज असून २०१९ च्या निवडणुकीत पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने अन्य पक्षातून नेते आयात करण्याची वेळ भाजपावर आल्याचा टोलाही सातव यांनी लगावला आहे. मंत्रिपदाचे प्रलोभन देऊन काँग्रेसच्या एका आमदाराला भाजपने फोडून घोडेबाजार करून सरकार चालवत असल्याचे सिद्ध केल्याची चपराकही खासदार सातव यांनी लगावली.