राजकोटची लढत भाजपला जड जाणार

गुजरातच्या राजकोट लोकसभा निवडणुकीत भाजपला जड जाणार असल्याचे चित्र आहे. येथून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले पुरुशोत्तम रुपाला यांच्या अडचणींत आणखी वाढ होताना दिसत आहे. राजपूत समाजाबद्दल केलेली टीपण्णी त्यांना भारी पडणार असून या समाजात रुपाला यांच्याविरोधात प्रचंड संताप आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दुसऱयांनी आपल्यावर सत्ता गाजवली. इंग्रजांनीही राज्य केले. त्यांनी आपल्याला प्रचंड त्रास दिला. राजाही त्यांच्यापुढे झुकला. राजाने त्यांच्यासोबत भोजन केले, आपल्या मुलींची लग्नेही त्यांच्याशी लावून दिली. परंतु, आपल्या दलित समाजाने असे केले नाही, त्यांनी धर्म बदलला नाही आणि त्यांच्याशी संबंधही जोडले नाहीत. त्यामुळेच दलितांवर प्रचंड अत्याचार केले गेले, असे रुपाला यांनी म्हटले होते. त्यामुळे राजपूत समाजाच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे.