
सामना ऑनलाईन । जयपूर
राजस्थानच्या गांधीनगर भागात दारूच्या नशेत असलेल्या एकाने गाडी चालवून चौघांना उडवले आहे. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. आरोपीचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ गाडी फुटपाथवर गेली, गाडी रस्त्यावर आणताना आरोपीने चार जणांना उडवले. आरोपी हा भाजप नेत्याच्या मुलगा आहे, अशी माहिती पुढे आली आहे.
आरोपीचे नाव भारत भूषण असून तो राजस्थानच्या करोली जिल्ह्यातील भाजप नेत्याचा मुलगा आहे. अपघात झाल्यानंतर उपस्थित जमावाने आरोपीला ताब्यात घेतले आणि मारझोड केली. पोलीस वेळीच घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेतले. तसेच जखमींना सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे दोन जणांना मृत घोषित करण्यात आले, तर दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
आरोपीच्या गाडीत राजस्थान भाजपचे विजिटिंग कार्ड आढळले आहे, तर गाडीच्या मागे एक फाटलेल्या अवस्थेत भाजपचे स्टिकर सापडले आहे. गाडीच्या पुढे एक कॅमेरा आहे, त्यात व्हिडियो रेकॉर्ड होत असतो. या कॅमेर्यातील मेमरी कार्ड पोलिसांनी जप्त केले असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


























































