पोलिसांकरवी शेतकऱ्यांच्या मुलांना मारहाण करणे हा कसला न्याय? राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या मुलांना पोलिसांकरवी थर्ड डिग्रीचा वापर करून बेदम मारहाण करणे, हा कसला न्याय?, हेच का तुमचे जनतेचे सरकार?, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोशल मीडियाद्वारे पत्रातून केला आहे.

दरम्यान, तुमच्या पोलिसांनी मारहाण करून अंगावर वळ उठलेले डाग जातील; पण यामुळे शेतकऱयांच्या मनावर झालेली जखम तुम्ही कशी बरी करणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

मागील गळीत हंगामातील थकीत हप्त्याच्या मागणीसाठी पुणे-बंगळुरू महामार्गावरील शिरोली पूल येथे 23 नोव्हेंबर रोजी शेतकऱयांनी चक्का जाम आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. गेले तीन महिने यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावाही केला होता. तरीही त्याला दाद दिली नाही. त्यामुळे याच मागणीसाठी शेतकऱयांच्या मुलांनी दोन दिवसांपूर्वी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला होता. मात्र, हातकणंगले पोलीस ठाण्यात पोलिसांनी याच शेतकऱयांच्या मुलांची पाठ पट्टय़ाने फोडून काळी निळी करून टाकली.

सनदशीर मार्गाने आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या मुलांना पोलिसांकरवी थर्ड डिग्रीचा वापर करून बेदम मारहाण करणे हा कसला न्याय? हेच का तुमचे जनतेचे सरकार?, तुमच्या पोलिसांनी मारहाण करून अंगावर वळ उठलेले डाग जातील; पण शेतकऱयांच्या मनावर झालेली जखम तुम्ही कशी बरी करणार? असे सवाल राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केले आहेत.