बंदी हुकुमानंतरही राजू शेट्टी बारसूला जाण्यावर ठाम, म्हणाले, ‘कोणताही कायदा मला…’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. त्याला समर्थन देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी हे रत्नागिरीला जाणार आहेत. पण, रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यास शेट्टी यांना बंदी हुकूम जारी करण्यात आला आहे. तरीही आपण बारसूला जाणारच, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.

राजू शेट्टी म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात येण्यास बंदीहुकूम घालण्यासाठी पोलीस मला शोधताहेत पण मी बारसूला जाणारच. कोणताही कायदा मला अडवू शकत नाही. अनेक नेत्यांना त्यांनी रत्नागिरीत यायला बंदी घातलेली आहे. मलाही कालपासून रत्नागिरीचे पोलीस शोधत असल्याचं कळलं. माझ्यावर रत्नागिरी जिल्ह्यात यायची बंदी असल्याचा हुकूम बजावण्यासाठीच ते येताहेत. ज्यावेळी आम्हाला जायचं असेल तेव्हा कुठलाही कायदा, कुठलीही बंदी आम्हाला अडवू शकत नाही. आणि आम्ही रत्नागिरीत गेल्यानंतरच तुम्हाला कळेल की आम्ही तिथे पोहोचलो आहोत. उद्योगपतींच्या सुपाऱ्या घेऊन अशा प्रकारे स्थानिकांवर दडपशाहीचा वरंवटा फिरवून जर सरकार प्रकल्प लादत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.