Rajya sabha Election – 36 टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, 21 टक्के उमेदवार अरबपती

केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर केली असून निवडणुकीसाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. 56 जागांसाठी 59 उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी 36 टक्के उमेदवारांवर गुन्हेगारीचे आरोप आहेत, तर 21 टक्के उमेदवार अरबपती आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने हा अहवाल दिला आहे. तसेच या उमेदवारांची सरासरी मालमत्ता 127.81 कोटी रुपये असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरताना उमेदवारांनी दाखल केलेल्या स्व-प्रतिज्ञापत्राचे एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी विश्लेषण केले आहे. यापैकी खराब कागदपत्रांमुळे कर्नाटकातील काँग्रेस उमेदवार जी.सी. चंद्रशेखर यांना विश्लेषणातून वगळण्यात आले असून उर्वरित 58 उमेदवारांच्या स्व-प्रतिज्ञापत्राचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार, 36 टक्के उमेदवारांनी आपल्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे नमूद केले आहे. पैकी 17 टक्के उमेदवारांना गंभीर गुन्हेगारी आरोप असून एका उमेदवारावर खुनाचा प्रयत्न केल्याशी संबंधित खटला दाखल आहे.

एडीआरच्या अहवालातून हे देखील स्पष्ट झाले आहे की, 21 टक्के उमेदवार अरबपती आहेत. त्यांच्याकडे 100 कोटींहून अधिक संपत्ती आहे. तर राज्यसभेच्या उमेदवारांची सरासरी संपत्ती 127.81 कोटी आहे. 59 पैकी 2 उमेदवारांची संपत्ती 1500 कोटीहून अधिक आहे. हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस उमेदवार अभिषेक मनू सिंघवी यांची एकूण संपत्ती 1872 कोटी, तर उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टीच्या उमेदवार जया अमिताभ बच्चन यांची संपत्ती 1578 कोटी रुपये आहे. तर तिसरे सर्वात श्रीमंत उमेदवार जेडीएसचे आहेत. कर्नाटकमधील जेडीएसचे उमेदवार कुपेंद्र रेड्डी यांची संपत्ती 817 कोटी आहे.

सर्वात गरीब उमेदवारांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बालयोगी उमेश नाथ यांचे नाव आघाडीवर आहे. ते मध्यप्रदेशमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांच्याकडे 47 लाखांची संपत्ती आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजपचे उमेदवार समिक भट्टाचार्य आणि उत्तर प्रदेशमधील भाजप उमेदवार संगीता यांचा नंबर लागला आहे. दोघांकडे 1 कोटींची संपत्ती आहे. दरम्यान, 17 टक्के उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पाचवी पास ते 12 वी पास आहे. तर 79 टक्के उमेदवारांनी पदवी किंवा उच्च पदवी आहे. तसेच 76 टक्के उमेदवार 51 ते 70 वयोगटातील असून 16 टक्के उमेदवार 31 ते 50 वयोगटातील आहे. यंदा राज्यसभेच्या उमेदवारांमध्ये फक्त 19 टक्के महिला आहेत.

पक्षनिहाय गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या 30 पैकी 8 (27 टक्के), काँग्रेसच्या 9 पैकी 6 (67 टक्के), तृणमूल काँग्रेसच्या 4 पैकी 1 (25 टक्के), समाजवादी पार्टीच्या 3 पैकी 2 (67 टक्के), वायएसआरसीपीच्या 3 पैकी 1 (33 टक्के), आरजेडीच्या 2 पैकी 1 (50 टक्के), बीजेडीच्या 2 पैकी 1 (50 टक्के) आणि बीआरएसच्या 1 पैकी 1 (100 टक्के) उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.