दशक्रिया विधीसाठी पाणी विकत घेण्याची वेळ, प्रसिद्ध राक्षसभुवनामागे पाणीटंचाईची साडेसाती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, गेवराई

बीड जिल्ह्यातील गेवराईत तालुक्यात असलेले राक्षसभुवन इथले शनिदेवाचे मंदीर हे शनि महाराजांच्या साडेतीन पीठापैकी एक मानले जाते. इथे दशक्रिया विधीही मोठ्या प्रमाणावर केले जातात. शनी मंदिराशेजारीच गोदावरी नदी आहे, मात्र तिचं पात्र कोरडं ठाक पडलं आहे. या नदीला पाणी नसल्याने इथे होणाऱ्या दशक्रिया विधींसाठी टँकरने पाणी मागवले जाते आणि ते विकत घेऊन मग हे विधी केले जातात.

godavari-in-rakshas-bhvan

असे मानले जाते की राक्षसभुवन येथे प्रभू रामचंद्राच्या हस्ते येथील शनिची मुर्ती स्थापित करण्यात आली. या मंदिराशेजारी असलेली गोदावरी नदी काही वर्षांपूर्वीपर्यंत दुथडी भरून वाहात होती, मात्र आता या नदीपात्रात एक थेंबही पाणी शिल्लक नाही. पैठणच्या नाथसागरातून सोडण्यात येणारे पाणी गुळज बंधाऱ्यातून राक्षसभुवनपर्यंत पोहचत होते. वाळूतस्करीमुळे नदीपात्रात पडलेले खड्डे आणि मोठ्या प्रमाणावर होणापे बाष्पीभवन यामुळे इथे येणारे पाणी वळवून गेवराई शहराकडे वळवण्यात आले.

राक्षसभुवन इथल्या शनिमंदिराप्रमाणेच तीर्थक्षेत्र पंचाळेश्वरही राज्यातील प्रसिद्ध स्थान आहे. श्री दत्तात्रय प्रभूंचे आत्मतीर्थ या नावाने हे स्थान ओळखले जाते. हे स्थान दत्तात्रय महाराजांचे भोजन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी संपूर्ण देशभरातून पौर्णिमा व अमावस्येला मोठ्यासंख्येने दत्तभक्त येतात. इथलीही परिस्थिती राक्षसभुवनप्रमाणेच असून शेजारी असलेल्या गोदावरी नदीत पाणीच नाहीये.

rakshan-buvan-watre-problem

नाथ सागरातून सोडण्यात येणारे पाणी देखील या पत्रात येत नाही. त्यामुळे राक्षसभुवनपेक्षा, पंचाळेश्वरची परिस्थिती वेगळी नाही. आजही या दोन्ही तिर्थक्षेत्रावर भीषण पाणीटंचाई आहे.या दोन तीर्थक्षेत्रामध्ये असलेल्या पाणीटंचाईमुळे भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी इथल्या ग्रामस्थांकडून आणि भाविकांकडून केली जात आहे.

गोदावरीच्या तीरावर राहणाऱ्या राक्षसभुवनातील रहिवाशांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी संघर्ष करावा लागत आहे. गोदावरी तर कोरडी पडलेली आहेच शिवाय गावातील आडे,  विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. गेले चार महिने इथे राहणाऱ्या एक हजार कुटुंबाला पाण्याची तहान भागवण्यासाठी रोज पाण्याचे जार विकत घ्यावे लागत आहे. पाण्याच्या दुर्क्षिक्षामुळे जारमधून पाणी विकणाऱ्या कारखान्यातले वाया जाणारे पाणी जमा करून इथले नागरीक त्याचाही वापर करतायत. इथे या पाण्यासाठीही रांग लावावी लागतेय.