
धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी युती सरकार कटिबध्द असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेतून सरकारने धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू केल्याचेही ते म्हणाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 225 व्या पुण्यतिथीनिमित्त चोंडी येथे झालेल्या कार्यक्रमात शिंदे बोलत होते.
शिंदे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या कालखंडामध्ये माहेश्वरी साडीची निर्मिती करण्याचा उद्योग मध्यप्रदेशात माहेश्वरला सुरू केला होता. आता त्याच धर्तीवर चौंडी येथे महिलांच्या हातांना काम देत महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या दृष्टिकोनातून अण्णासाहेब डांगे यांच्या प्रेरणेतून माहेश्वरी साडी निर्मिती उद्योग सुरु झाला आहे. यामध्ये 250 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यातून दररोज 100 महिला काम करत आहेत आणि 7 हजार महिलांना या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम बनविण्याचे काम सुरू झाले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी राजकारण, समाजकारण करत समाजातील वंचित-पीडित घटकांना जोडण्याचे काम हाती घेतले होते, त्याच धर्तीवर चोंडी येथे माहेश्वरी साडीनिर्मिती उद्योग सुरु झालेला आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील नागरिकांना पूरक व्यवसाय मिळाला पाहिजे हा दृष्टीकोन पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जसा आखला होता तसाच त्यांच्या जन्मगावी देखील आण्णासाहेबांच्या माध्यमातुन साकार झालेला पहायला मिळत आहे. या उद्योगाची आणखी व्याप्ती वाढली पाहिजे, अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी कार्यरत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला आमदार रामहरी रूपनर, मल्हारसेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, व्याख्याते वसंत हंकारे, चिमनराव डांगे, सोमनाथ पाचरणे, अभिमान सोनवणे, पांडुरंग उबाळे, अविनाश शिंदे, पुष्पलता गुलवाडे,अलका गोडे, श्रीराम पुंडे, सुभाष सोनावणे, पांडुरंग काकडे, संभाजीराव बैकरे, विष्णू माने, आर.एस.चोपडे, उमेश घुरडे, शिवाजीराव वाटेगावकर, सचिन दुलवान, युवराज धोंडे व राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.





























































