
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
शॅम्पू, साबण, किराणा सामान उद्योगानंतर योग गुरू रामदेव बाबा आता वस्त्रोद्योग क्षेत्रात उतरले आहेत. सोमवारी धनोत्रयदशीच्या शुभमुहूर्तावर बाबा रामदेव यांनी दिल्लीत नेताजी सुभाष या भागात पतंजली ‘परिधान’ या रेडीमेड कपड्यांच्या शोरुमचे उद्धघाटन केले. यावेळी प्रसिद्ध पैलवान सुशील कुमार, फिल्म निर्माते मधुर भांडारकर हे देखील उपस्थित होते
पतंजली परिधानच्या या शोरुममध्ये 3 हजार प्रकारचे कपडे विक्रीस ठेवण्यात आले आहेत. यात हिंदुस्थानी कपड्यांपासून पाश्चिमात्य कपड्यांचा समावेश आहे. तसेच आधुनिक डिझाईनचे कृत्रिम दागिनेही या शोरुममध्ये मिळणार आहेत. सध्या दिवाळीची धूम सुरू असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पतंजलीने कपड्यांवर 25 टक्के सूट ठेवली आहे.

डिसेंबर महिन्यापर्यंत देशभरात 25 नवीन शोरुम सुरू करणार असल्याचे यावेळी बाबा रामदेव यांनी सांगितले आहे. सध्या या शोरुममध्ये 1100 रुपयाला जीन्स मिळत असून त्याला तरुणांची अधिक पसंती असेल असे बांबानी म्हटले आहे. पुरुषांच्या सर्वप्रकारच्या कपड्यांना ‘संस्कार’ नाव देण्यात आले असून महिलांच्या कपड्यांना ‘आस्था’ हे नाव देण्यात आले आहे. पुरुषांच्या कपड्यांमध्ये अंतरवस्त्रांपासून स्पोर्टस वेअर, तर महिलांच्या कपड्यांमध्येही सर्व प्रकारचे कपडे पतंजली परिधान शोरुममध्ये मिळणार आहेत.
परदेशी कंपन्यांना टक्कर देण्यासाठीच धनत्रयोदशीच्या दिवशी पतंजली परिधान सुरू केल्याचे बाबांनी यावेळी सांगितले. दरम्यान, या शोरुमच्या निमंत्रण पत्रिकेत खादीने ज्याप्रकारे स्वतंत्रता संग्रामची सुरुवात केली, त्याचप्रमाणे पतंजली परिधान देशात आर्थिक स्वातंत्र्याची नवीन क्रांती सुरू करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.



























































