सातारा जिल्ह्यात बेड वाढविण्याबाबत तात्काळ कार्यवाही करा – रामराजे नाईक निंबाळकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढवाव्यात तसेच ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे, असे रुग्ण ऑक्सिजन पासून वंचित राहणार याची खबरदारी घ्यावी , अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या आहेत.

कोरोना प्रबतिबंध उपाययोजना बैठक विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहत झाली. या वेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील,आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यात बेडची संख्या वाढवा, अशा सूचना करुन रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, 18 वर्षांपुढील युवकांसाठी 1 मे पासून लसीकरणाची मोहिम राबविण्यात येणार आहे, ही मोहिम कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सूचनाही त्यांनी या बैठकीत केली.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, लसीकरणाची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. तसेच वाढती रुग्णांची संख्या पाहता आरोग्य सुविधा वाढण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये 78 बेडचे कोविड सेंटरचे काम सुरु असून हे कोविड सेंटर येत्या दोन ते तीन दिवसात सुरु करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडिसिव्हर औषधाचा अधिकचा पुरवठा जिल्ह्याला व्हावा यासाठीही प्रयत्न करीत आहोत. ग्रामीण भागातील नागरिक कोरोनाची लक्षण असूनही घरातच उपचार घेत असून शेवटच्य क्षणी ते रुग्णालयात येत आहेत. त्यामुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. हे मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी घरोघरी जावून सर्वेक्षण करण्यात येणार आहे, यासाठी शिक्षकांच्या नेमणुकाही करण्यात येणार आल्याचे पालकमंत्री पाटील यांनी बैठकीत सांगितले.

शासनाने कोरोनाच्या पाशर्वभूमीवर जे निर्बंध घातले आहेत त्याची जिल्ह्यामध्ये कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस विभागाला दिले असल्याचे गृह राज्यमंत्री देसाई यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील,आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, आमदार दिपक चव्हाण यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.