2300 कोटींचा गैरव्यवहार; रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

औषध निर्माण क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱया रॅनबॅक्सी या कंपनीचे माजी प्रवर्तक मालविंदर सिंह यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. आरएफएल अर्थात रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडच्या निधीत तब्बल 2300 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मलविंदर यांच्यासह रेलिगेयर एंटरप्रायजेसचे माजी मुख्य संचालक सुनील गोधवानी यांनाही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या हे दोघेही तिहार कारागृहात असून तेथून ईडीने दोघांनाही ताब्यात घेतले.

मलिंवदर सिंह आणि सुनील गोधवानी यांनी आरएफएलच्या निधीत घोटाळा केल्यामुळे कंपनीला तब्बल 2 हजार 397 कोटी रुपयांचे नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मलविंदर यांच्यासह त्यांचा भाऊ शिविंदर, गोधवानी, कवी अरोरा आणि अनिल सक्सेना यांना अटक केली. डिसेंबर 2018 मध्ये रेलिगेयर फिनवेस्ट लिमिटेडने दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी बोलावले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांना पोलिसांनी जेरबंद केले होते.