
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
हिंदुस्थानातील प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. चार गट, 37 संघ, 160 सामने अन् 647 दिवसांचा थरार… रणजी क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या हंगामाची ही स्टोरी. सर्वाधिक वेळा रणजी चॅम्पियन ठरलेला मुंबई आणि महाराष्ट्र हे संघ एकाच गटात आहेत. यावेळी मात्र स्टार क्रिकेटपटूंची अनुपस्थिती क्रिकेटप्रेमींसाठी निराशाजनक ठरू शकते. पण यामुळे या मोसमात युवा खेळाडू गवसल्यास आश्चर्य वाटायला नको.
रोहित, अजिंक्य, पृथ्वी, अय्यर राष्ट्रीय संघातून खेळणार
मुंबईच्या संघाने यंदा विजय हजारे ट्रॉफी जिंकून मोसमाची सुरुवात दमदार केली, पण आजपासून सुरू होणाऱ्या रणजी स्पर्धेत मुंबईला स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत मैदानात उतरावे लागणार आहे. हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडीज दौऱयानंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. हिंदुस्थानाचा ‘अ’ संघ न्यूझीलंडच्या ‘अ’ संघाशी दोन हात करणार आहे. या संघांमध्ये मुंबईच्या खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामुळे रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ व श्रेयस अय्यर या खेळाडूंना मुंबईसाठी खेळता येणार नाही. तसेच शार्दूल ठाकूरलाही दुखापत झालीय. त्यामुळे मुंबईच्या संघाला धवल कुलकर्णी, आदित्य तरे, सिद्धेश लाड, सूर्यकुमार यादव या अनुभवी खेळाडूंवर जास्त अवलंबून राहावे लागणार आहे.
याही संघांना बसणार फटका
मुंबईसह कर्नाटक, गुजरात, विदर्भ, पंजाब, दिल्ली, आंध्र व झारखंड या संघांनाही स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीचा फटका बसणार आहे. करुण नायर, मनीष पांडे, मयांक अग्रवाल, के. गौतम व आर. समर्थ हे कर्नाटकचे खेळाडू हिंदुस्थान व हिंदुस्थान ‘अ’ संघामधून खेळणार आहेत. तसेच गुजरातचा पार्थिव पटेल, दिल्लीचा नवदीप सैनी, विदर्भाचे रजनीश गुरबानी, उमेश यादव, पंजाबचे शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंग, आंध्रचे हनुमा विहारी, के. एस. भारत आणि झारखंडचे ईशान किशन व शाहबाज नदीम हेही राष्ट्रीय संघातून खेळणार आहेत. त्यामुळे बहुतांशी संघांमधून युवा खेळाडूंना संधी देण्यात येईल असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
उपांत्यपूर्व फेरीत पोहचण्याचा मार्ग
रणजी ट्रॉफीमध्ये चार गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात आली आहे. यावेळी ‘अ’ व ‘ब’ गटामध्ये प्रत्येकी नऊ संघ असून या दोन गटांमधून पाच संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणार आहेत. ‘क’ गटामध्ये दहा संघांचा समावेश असून यामधून दोन आणि प्लेट गटातून अव्वल संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करील.



























































