अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पळून जाणाऱ्याला अटक; कोतवाली पोलिसांची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरासमोर खेळणाऱ्या एका सातवर्षीय बालिकेवर मंगल कार्यालयातील वॉचमनने अत्याचार केल्याची घटना शहरातील काटवन खंडोबा रोडवर घडली आहे. या घटनेनंतर शहर सोडून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या आहेत. युसूफ हमीद कुरेशी (वय 34, सध्या रा. काटवन खंडोबा, मूळ रा. लासुरणे, ता. बारामती, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलीची आई मोलमजुरीचे काम करीत असून बुधवारी त्या कामावर गेल्या असताना, आरोपी कुरेशी हा पीडित मुलीला दुचाकीवरून त्याच्या कामाच्या ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दुपारी 4 च्या सुमारास पीडित बालिकेचे आई-वडील घरी आल्यावर त्यांना हा प्रकार समजला. त्यानंतर त्यांनी गुरुवारी कोतवाली पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी कुरेशी याच्याविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी आरोपीच्या शोधासाठी दोन पथके रवाना केली. दरम्यान, आरोपी कुरेशी हा नगर शहर सोडून जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांनी रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसरात दोन पथके पाठविली. आरोपीचा शोध सुरू असताना आरोपी आयुर्वेद कॉलेज ते काटवन खंडोबा रोडने नगर शहर सोडून जात असल्याची माहिती या पथकाला मिळाली. या पथकाने आरोपीला पकडून पोलीस ठाण्यात आणले. चौकशीदरम्यान त्याने गुन्हा कबूल केला.

खाऊ देऊन ओळख केली
आरोपीने पीडित मुलीला गुन्हा घडल्याच्या तीन-चार दिवस अगोदर पाणीपुरी, चॉकलेट तसेच इतर खाण्याचे पदार्थ देऊन ओळख निर्माण केली होती. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने हे गैरकृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले.