शिवछत्रपतींचे अस्सल आणि अप्रकाशित पत्र सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय आणि राजकीय धोरणांवर प्रकाश टाकणारे आणि ‘स्वराज्य’ या राजांच्या संकल्पनेत सामावलेला सामान्य माणसाचा विचार अधोरेखित करणारे खुद्द शिवछत्रपतींचेच अस्सल आणि अप्रकाशित पत्र उजेडात आले आहे. हे पत्र इतिहास संशोधक घनश्याम ढाणे यांना धुळ्यातील समर्थ वाग्देवता मंदिर येथे सापडले आहे.

वसंत चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने घनश्याम ढाणे यांना सापडलेल्या इतिहासकालीन पत्राविषयी माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. रजनी इंदुलकर उपस्थित होत्या.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी लिहिलेले अस्सल अप्रकाशित पत्र प्रकाशझोतात आले असून, इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी त्याचा अनुवाद केला आहे. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरात हे पत्र आढळले आहे. मोडी भाषेतील या पत्रात वरच्या बाजूला मंगलाकार ही शिवकालीन खूण आढळली असून, त्याखेरीज पत्रात शिवकालीन धाटणीचा मजकूर लिहिलेला आहे. या पत्राच्या मागील बाजूस मुस्लिम कालगणनेप्रमाणे तारीख लिहिलेली आहे. त्यानुसार २ फेब्रुवारी १६७४ रोजी पत्र लिहिल्याचे समोर आले आहे. सुमारे ३४४ वर्षे जुने असलेल्या या पत्राच्या शाईचा दर्जा आजही व्यवस्थित टिकून आहे. रायगडावरून पाली येथे पाठवलेले हे पत्र राज्याभिषेकाच्या पाच महिने आधीचे आहे. याबाबत माहिती देताना ढाणे यांनी महाराजांची एकूण २७३ पत्रे प्रकाशित असून त्यापैकी १०३ स्थायी स्वरूपात उपलब्ध असल्याचे सांगितले. या पत्राची लांबी १ फूट ३ इंच,तर रुंदी ६.५ इंच आहे.

महाराजांनी नागोजी पाटील कालभार (आत्ताचे काळभोर) यांना लिहिले आहे. पाली गावचे पाटील असणाऱ्या कालभार यांची पाटीलकी खराडे पाटील हिरावून घेत होते. त्याविषयावर महाराजांनी कालभार पाटील यांना अभयपत्र किंवा कौलनामा लिहिला आहे.