
फोन टॅपिंग प्रकरणातील गुप्त माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी लीक केली. तसेच या प्रकरणाची सरकारद्वारे केली जाणारी चौकशी ही एकतर्फी व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा रश्मी शुक्ला यांच्या वतीने आज मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. याप्रकरणी न्यायालय उद्या शुक्रवारी निर्णय जाहीर करणार आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना काही व्यक्ती व मंत्र्यांचे अनधिकृतपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध सायबर पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई करू नये तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा अशी मागणी करत शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. शुक्ला यांच्या वतीने ज्येष्ठ कौन्सिल महेश जेठमलानी यांनी खंडपीठाला सांगितले की, रश्मी शुक्ला यांनी एसआयटी सोडल्यानंतर तिथून कुठलाही कागद, अहवाल अथवा पेन ड्राइव्ह सोबत नेलेला नाही. त्यामुळे त्यांची याप्रकरणी चौकशी करण्याचा प्रश्नच येत नाही. सुनावणीदरम्यान जेठमलानी यांनी खंडपीठासमोर शुक्ला यांच्याकडील पेन ड्राइव्ह सरकारी वकील दरायुस खंबाटा यांना देण्याचा प्रयत्न केला, मात्र ऍड. खंबाटा यांनी तो पेन ड्राइव्ह स्वीकारण्यास नकार दिला. या प्रकरणावरील युक्तिवाद पूर्ण झाला असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.






























































