
>> रश्मी वारंग
हिंदुस्थानी स्नॅक्स जगभरात लोकप्रिय करणारा पदार्थ कोणता? या प्रश्नाचे सर्वात आश्वासक उत्तर म्हणजे समोसा. परदेशी मूळ असूनही आता ‘इंडियन स्नॅक्स’ म्हणून मिरवणाऱ्या या समोशांची ही भरपेट गोष्ट.
आत सारण आणि बाहेरून लपेटलेले आवरण असे जगभरात अनेक पदार्थ आहेत. समोसा त्यापैकीच एक, पण मध्य आशियाई देशांत जन्माला आलेल्या या समोशाच्या निर्मितीमागे विशिष्ट हेतू होता. या प्रांतातील व्यापारी दूरवर प्रवास करत. या प्रवासासाठी खाण्यापिण्याचा सरंजाम घेऊन फिरण्याऐवजी आत मांस किंवा भाज्यांचे सारण भरून तळायला ‘रेडी टू कुक’ समोसे हे व्यापारी सोबत नेत. अगदीच कोरडं काही खाण्याऐवजी तिथल्या तिथे गरम तळलेले समोसे खाणं या प्रवाशांसाठी सोपं होतं. त्यातूनच समोशाचा जन्म झाला.
अरबी ‘संबुसक’ किंवा ‘संबुसाज’ हा मूळ शब्द आपल्या भाषेत येताना ‘समोसा’ असा बदलत गेला. पर्शियन ग्रंथ ‘निमतनामा – ई- नसिरुद्दशाही’ या ग्रंथात समोसा बनवण्याची कृती आढळते, तर एका चित्रात समोसा वाटप करतानाचा प्रसंग दिसतो.
मध्य आशियातला हा समोसा आपल्या देशात 13 व्या शतकात उगवला. त्याआधी समोसा आशियाई देशांत होताच, पण हिंदुस्थानात येण्यासाठी बराच काळ गेला. मध्यपूर्व देशांचे खानसामे दिल्ली सल्तनतीत रुजू झाल्यावर त्यांच्याकडून समोशाची पाककृती आपल्या देशात आली. या काळातील विविध ग्रंथांत भरपूर काजू, बदाम, पिस्ते यांचा मुबलक वापर समोशाच्या सारणात होत असल्याचे उल्लेख आढळतात. राजदरबारी मुत्सद्दी अमीर खुस्रो याने मांस, तूप, कांदा यांच्या सारणाने भरलेल्या समोशांचा उल्लेख केला आहे. अमीर खुस्रोचे प्रसिद्ध कोडे प्रश्न विचारते, ‘समोसा क्यूं नहीं खाया? जुता क्यूं नहीं पहना?’ दोघांचेही उत्तर एकच…तला नही (समोसा तळला नाही आणि चपलेला तळवा नाही).
समोशाचं खास वैशिष्टय़ म्हणजे, टपरीवरच्या समोसापावपासून हायफाय पार्टीतल्या शुद्ध तुपात तळलेल्या समोशांपर्यंत तो सर्वत्र वावरतो. तो आबालवृद्धांना प्रिय आहे.
वडापावची प्रादेशिक अस्मिता समोशाकडे नसली तरी तो इंडियन स्ट्रीट फुड म्हणून किंवा स्नॅक्स म्हणून मिरवतो. समोसा परवडणाऱ्या किमतीत मिळतो. एकदोन समोसे पोटभरीचे होतात. सकाळ- संध्याकाळच्या नाश्त्यापासून ते अचानक ठरलेल्या पार्टीपर्यंत तो सदैव तत्पर असतो हे त्याचे खास गुणधर्म त्याला त्रिकोणी स्वानंद बनवतात. कोणा गीतकाराला त्याच्यावर ‘जब तक रहेगा समोसे मे आलू तेरा रहुंगा ओ मेरी शालू’ हे गीत लिहावेसे वाटते.
असा हा गरमागरम समोसा चटणीचा हात धरून प्लेटमधून समोर दाखल होतो. बाहेरचं आवरण आणि आतलं सारण वेगवेगळं म्हणता म्हणता आपल्या मुखात अद्वैत धारण करतात. समोशाचं परदेशी मूळ वगैरेंचा विसर पडतो आणि तो भरलेला त्रिकोणावतार खाताना आपणही ‘भरून’ पावतो.
समोसा संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. आसाम, ओदिशा, बंगाल, बिहारमध्ये हाच समोसा सिंगारा बनतो. हैदराबादेत लुख्मी, गोव्यात चामुका. नावं वेगळी, पण पदार्थ तोच. पंजाबी समोसा तर आपण खातोच, पण कर्नाटकातील कांदा समोसा, गुजरातमधील पट्टी समोसा लोकप्रिय आहेत. आपल्या देशाबाहेर हा समोसा आपले नाव मिरवतो… ब्रिटिश हिंदुस्थान सोडून जाताना ज्या गोष्टी हसत हसत घेऊन गेले त्यापैकी एक म्हणजे समोसा.



























































