कोपरगावात गोदावरी नदी ओव्हरफ्लो, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी जलसेतू पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

गोदावरी नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे कोपरगाव येथील लहान पूल (राष्ट्रसंत जनार्दन स्वामी जलसेतू) पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून तब्बल 90 हजार क्युसेसने विसर्ग सुरु असल्याने कोपरगावात गोदावरी नदीला पूर आला आहे. तालुक्यातील भोजडे येथील कोळ नदीवरील पूल पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. यामुळे पलीकडच्या काही गावांचा संपर्क तुटला आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून लहान पुलावरून पाणी गेल्याने नदीकाठच्या उपनगरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतुकीवरही अंशतः परिणाम झाला आहे. नदीकाठच्या वस्त्या, शेतजमिनी व पूरग्रस्त भाग धोक्याच्या झोनमध्ये आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीकाठापासून दूर राहावे, तसेच सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन तहसील प्रशासन व पोलिसांकडून करण्यात आले आहे.

गोदावरीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे कोपरगावकरांमध्ये चिंतेचे वातावरण असून, धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.