
सामना प्रतिनिधी, जामखेड
जामखेड येथील खर्डा चौकात चार तासांपासून सकल मराठा समाजाचा रास्तारोको आंदोलन सुरू केले आहे. यामुळे पाच पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पहिला हुतात्मा ठरलेले ‘काकासाहेब शिंदे अमर रहे’ अशा घोषणा देत येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी भव्य मोटारसायकलवर रॅली काढण्यात आली आणि दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून मराठा समाजाला आपला पाठिंबा दर्शविला.
आज सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डपासून सकल मराठा समाजाची मोटारसायकलवर रॅली काढण्यात आली बीड रोडवरून मेन रोड खर्डा रोडनंतर बसस्थानकाजवळ आली आणि दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर बसस्थानकापासून खर्डा चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.




























































