
सामना ऑनलाईन | मुंबई
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यानंतर आता जेष्ठ उद्योगपती रतन टाटा सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत एका व्यासपीठावर येणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नाना पालकर स्मृती समिती या वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थेने येत्या २४ ऑगस्टला आयोजिलेल्या कार्यक्रमात टाटा आणि भागवत एकत्र येतील अशी माहिती संघाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.
गेल्या महिन्यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व सरसंघचालक मोहन भागवत नागपूरमध्ये संघाच्या कार्यक्रमात एका मंचावर आले होते. यंदा नाना पालकर यांची जन्मशताब्दी साजरी होणार आहे. त्यानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमाला सरसंघचालक भागवत उपस्थित राहणार असून त्यांच्यासोबत प्रमुख अतिथी म्हणून रतन टाटा यांचीही उपस्थिती असेल.
नाना पालकर स्मृती समिती कॅन्सर रुग्णांसाठी गेली अनेक वर्षे सेवाभावी कार्य करीत आहे. समितीचे कार्यालय परळच्या टाटा मेमोरियल रुग्णालयानजीकच आहे. या एनजीओला भेट देत टाटा यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुकही केले आहे.

























































